
मुंबई रेल्वे विकास महामंडळाला एमएमआरडीएकडून 150 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वेच्या प्रकल्पांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ केंद्र व राज्य सरकारच्या समसमान निधीतून एमयूटीपी 2 आणि 3 ची कामे करीत आहे. एमयूटीपी-2 मध्ये सीएसएमटी ते कुर्ला पाचवा व सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचवा व सहावा मार्ग तर एमयूटीपी -3 मध्ये विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, ऐरोली ते कळवा एलिवेटेड लिंक, 47 एसी लोकल अशा सुमारे 11 हजार कोटींच्या प्रकल्पांचा समावेश आहे. रेल्वे अर्थसंकल्पात यंदा 750 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.



























































