
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिम याचे हस्तक व नातेवाईकांच्या 29 ठिकाणी छापे मारल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी या संबधी जवळपास 18 जणांची एनआयए कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यात माहीम दर्गाचे ट्रस्टी सुहेल खंडवाणी, छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुट यांचाही समावेश होता. दरम्यान, ईडी आणि आयबीचे अधिकारीदेखील आज एनआयएच्या कार्यालयात आले होते असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुंबई व मीरा-भाईंदर येथील 29 ठिकाणी एनआयएने सोमवारी छापे मारले होते. नागपाडा, सांताक्रुझ, माहीम, गोरेगाव आदी ठिकाणी हे छापासत्र झाले होते. त्याच दिवशी एनआयएने छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुट, माहीम दर्गाचे विश्वस्त सुहेल खंडवाणी यांच्याकडे चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा सलीम, खंडवाणी यांना चौकशीसाठी पेडर रोड येथील एनआयए कार्यालयात बोलविण्यात आले होते. आज तिसऱ्या दिवशीदेखील 18 जणांकडे चौकशी करण्यात आली. आज एनआयएच्या मुंबई कार्यालयात ईडी व आयबीचे अधिकारीदेखील आले होते असे समजते.





























































