उन्हाळी स्पेशल एसटी व रेल्वेला गर्दी वाढली, खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांची लूट सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बच्चे कंपनीला घेऊन पालक आपआपल्या गावी जात असताना खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी लूट सुरू केली आहे. एसटी आणि रेल्वे गाड्यांना गर्दी असल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी ट्रॅव्हलचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी स्लीपर कोचचे भाडे दोन ते अडीच हजार रूपये झाले आहे. परिवहन विभागाने अशा अव्वाच्या सव्वा भाडे आकारणार्‍या खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

रेल्वेने उन्हाळी सुट्टी निमित्त सोडलेल्या गाड्या बहुतांशी विकेण्डला आहेत. सध्या जोडून सुट्ट्या आल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. रेल्वेने जनरल तिकीटांचे संख्या कमी करीत सिटींग केल्याने नेहमीच्या जनरल तिकीटे काढून गावी जाणार्‍या प्रवाशांची अडचण वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना खाजगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतूकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी बसचालकाचे त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणार्‍या प्रति कि.मी.भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक भाडे घेऊ नये असे आदेश आहेत. तरीही गर्दीच्या हंगामात प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारले जात आहे. परिवहन विभागाने अशा खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्याची त्यामुळे प्रवाशांनी केली आहे.