Dharmaveer Movie Review – धर्मवीर : धगधगत्या अग्निकुंडाचा तेजस्वी जीवनपट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी पाटकर – फडके

कोणतीही संघटना उभी राहते ती निष्ठावान आणि सच्च्या कार्यकर्त्यांच्या बळावरच. त्यांची निष्ठा, संघटनेला वाहिलेलं सर्वस्व, जाज्वल्य अभिमान हे सगळं संघटनेच्या बांधणीत महत्त्वाचं असतं. इतकं की एखादा चेहरा या गुणवैशिष्ट्यांची ओळख बनून जातो. अशाच एका कडवट धर्माभिमानी, निष्ठावान आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अढळ श्रद्धा असणाऱ्या आणि सर्वसामान्यांसाठी झटलेल्या धर्मवीर आनंद दिघे नावाच्या एका धगधगत्या अग्निकुंडाचा ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकला आहे.

धर्मवीर आनंद दिघे हे नाव माहीत नाही असा माणूस ठाण्यात शोधूनही सापडणार नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले, ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणून प्रसिद्ध असणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे आनंद दिघे वास्तवात नेमके कसे होते, त्यांच्याविषयी कोणतंही लिखित साहित्य उपलब्ध नसतानाही मांडण्याचा प्रयत्न निर्माता मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजने केला आहे. शिवसेना नावाच्या भगव्या वादळाचा ठाणे जिल्ह्यातला लोकप्रियतेचा प्रवासही या चरित्रपटातून उलगडतो.

चित्रपटाची कथा सुरू होते ती 26 ऑगस्ट 2021पासून. या दिवशी एक मुस्लीम तरुण रिक्षाचालक (गश्मीर महाजनी) ठाणे स्थानकाबाहेर ग्राहकाची वाट पाहत उभा असतो. त्याचं पहिलं गिऱ्हाईक असते ती तानिया महापात्रा (श्रुती मराठे) नावाची वार्ताहर तरुणी. चॅनेलने ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या श्रद्धांजली सभेच्या कव्हरिंगसाठी तिची नेमणूक केलेली असते. बॉलिवूडची पार्टी सोडून ठाण्यातल्या एका राजकारण्याच्या श्रद्धांजली सभेला जायला लागल्याने नाराज असलेल्या तानियाला रिक्षाचालक धर्मवीर आनंद दिघे यांची ओळख करून देतो आणि सुरू होतो एक धगधगता प्रवास…. शिवसेनेसाठी काम करणाऱ्या एका कोवळ्या वयाच्या तरुणावर पक्ष तळागाळात पोहोचवण्याची धुरा दिली जाते आणि तिथून या वादळी आयुष्याला सुरुवात होते.

पक्षाला तळागाळात रुजवणं, त्याला ओळख मिळवून देणं, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं, सामाजिक तंटे मिटवणं, पक्षबांधणी करणं अशा विविध कामांमधून आनंद दिघेंची ओळख होऊ लागते. तिथपासून मग त्यांचा राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक प्रवासही हा चित्रपट उलगडून सांगतो. हिंदुहृदयसम्राटांप्रति भक्तिभाव आणि निष्ठा असणारे, पक्षबांधणीसाठी अहोरात्र मेहनत करणारे, स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता सामान्यांसाठी झटलेले, कडवट धर्माभिमानी असूनही समाजाचा एकोपा टिकवणारे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी धावून जाणारे, प्रचंड लोकप्रियता मिळवणारे आनंद दिघे आपल्याला या चित्रपटातून दिसतात.

चित्रपटांच्या इतिहासात फार कमी चरित्रपट असे आहेत जे राजकीय व्यक्तिमत्त्वांना उलगडून दाखवतात. असा चरित्रपट एकसुरी किंवा कंटाळवाणा होण्याची शक्यता असते. पण, लेखक, पटकथाकार आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मात्र या चरित्रपटाला रंजक पटकथा आणि दमदार संवादांची जोड दिली आहे. पटकथा उलगडण्याचा प्रवास संदर्भासहित आल्याने प्रेक्षक त्यात गुंततो. नकळत धर्मवीरांच्या आयुष्याचा भाग होतो, हे दिग्दर्शकाचं यश म्हणावं लागेल. या चित्रपटाचे संवाद अतिशय दमदार आहेत. तीच बाब अभिनयाची. धर्मवीर आनंद दिघे यांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक या कलाकाराला पैकीच्या पैकी गुण द्यावेच लागतील इतकी कमाल त्याने या चित्रपटातून केली आहे. दिग्दर्शन, परीक्षण, गायन या सगळ्या मुशाफिरीपलिकडे त्याच्यात एक अत्यंत अष्टपैलू अभिनेता आहे, याची खात्री त्याने पुन्हा एकदा पटवून दिली आहे.

वास्तविक प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्वात काहीही साम्य नाही. पण, तरीही प्रसाद हे आनंद दिघे म्हणून प्रेक्षकांच्या मनात उतरतात. याचं श्रेय जितकं त्यांच्या अभिनयाला जातं, तितकंच ते त्यांच्या रंगभूषेला आणि वेशभूषेलाही जातं. रंगभूषाकार विद्याधर भट्टे आणि वेशभूषाकार रश्मी सावंत यांनी केलेली मेहनत कमाल म्हणावी अशी आहे. शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत असणाऱ्या मकरंद पाध्ये यांच्या अभिनयाला दाद द्यावी तितकी कमी आहे. आवाज, संवादफेक, देहबोली या सर्वांमधून त्यांनी तमाम प्रेक्षकांना पुनश्च बाळासाहेबांचं दर्शन घडवलं आहे. तर शुभांगी लाटकर या भूमिका छोटी असूनही शिवसैनिकांच्या माँसाहेबांचं ममत्व प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. अभिनेता क्षितीज दाते याने साकारलेले एकनाथ शिंदे हे देखील दाद मिळवून जातात. अन्य सर्वांच्या भूमिकाही यथायोग्य वठल्या आहेत.

चित्रपटाच्या तांत्रिक बाबींकडे पाहिल्यास एक देखणा चरित्रपट पाहिल्याचं समाधान आपल्याला नक्की मिळू शकतं. ही कमाल केदार गायकवाड यांच्या छायांकनाने केली आहे. या चित्रपटातल्या काही फ्रेम्स अतिशय बोलक्या पद्धतीने चित्रीत करण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील गाणीही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि सुरेल आहेत. विशेषतः गुरुपौर्णिमा, अष्टमी आणि आनंद हरपला ही गाणी अतिशय अर्थपूर्ण आहेत. पण, या चित्रपटाची लांबी थोडी जास्त आहे. काही ठिकाणी कात्री लागली असती तर चित्रपट आणखी गोळीबंद झाला असता, असं वाटून जातं.

धर्मवीर आनंद दिघे हे लोकनेते होते, ते लोकनेते म्हणूनच जगले. एक सच्चा, निष्ठावंत कार्यकर्ता कर्तव्यासाठी पेटून उठला तर काय कमाल करू शकतो, याची पुरेपूर कल्पना या चरित्रपटातून आपल्याला येते. कडवट धर्माभिमानी असलेल्या या धगधगत्या अग्निकुंडाचा हा तेजस्वी जीवनपट आवर्जून पाहावा, असा आहे हे निश्चित!