अग्निसुरक्षा नसलेल्या 151 सोसायटय़ांना पालिकेची नोटीस, कार्यवाही करा अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या अग्निशमन दलाकडून सोसायटय़ांच्या झाडाझडतीत अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे समोर आल्याने 151 सोसायटय़ांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये 120 दिवसांत अग्निशमन यंत्रणा सक्षम करून पालिकेकडे अहवाल सादर केला नाही तर न्यायालयीन-कायदेशीर कारवाई होऊ शकते.

पालिकेकडून इमारतींमध्ये फायर ऑडिट करून दर सहा महिन्यांनी अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आल्याने पालिकेकडून काही इमारतींची तपासणीही करण्यात येते. पालिकेच्या अग्निशमन दलाने नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 या सहा महिन्यांत केलेल्या अग्निसुरक्षेच्या तपासणीत 329 इमारतींपैकी 151 इमारतीत अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर 151 इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे.

अशी होते कार्यवाही
n मुंबईत तब्बल 40 लाखांवर मालमत्ता आहेत. उत्तुंग इमारतींना परवानगी देताना इमारतीत अग्निशमन यंत्रणा तैनात असेल तरच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. इमारतीचे फायर ऑडिट करून अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र दर सहा महिन्यांनी सादर करावे लागते.
n मालक किंवा भोगवटाधारकांनी पात्र आणि सक्षम संस्थेकडून ऑडिट करून यंत्रणा सक्षम असल्याबाबत अग्निशमन दलाकडे ‘फॉर्म बी’ सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाइफ सेफ्टी अॅक्ट मेजर्स अॅक्ट 2006’ नुसार कारवाई करण्यात येते.