आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार रमेश लटके यांचे बुधवारी रात्री आकस्मिक निधन झाले. आमदार रमेश लटके हे सहपरिवार दुबईला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे वय 52 वर्षे होते. रमेश लटके यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मुलगा, मुलगी, भाऊ-बहीण असा परिवार आहे.

रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या सामाजिक कारकीर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. रमश लटके यांनी 1997 ते 2012 असे सलग तीन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात त्यांनी काँग्रेसचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टींचा पराभव केला. त्यानंतर 2019 च्या लढतीतही लटके यांनी अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांचा पराभव करून 16 हजार 965 इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

अंधेरीच्या कामगार कल्याण भवन मैदानात अंत्यदर्शन

आमदार रमेश लटके यांचे पार्थिव दुबईहून शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावर आणण्यात येणार आहे. कामगार कल्याण भवन मैदान, आझाद रोड, गुंदवली, अंधेरी पूर्व येथे सकाळी 9 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. 11.30 नंतर त्यांची अंत्ययात्रा कामगार कल्याण भवन येथून गुंदवली मोगाविरा बँक, रमेश लटके यांचे जनसंपर्क कार्यालय, वर्मानगर, जुना नागरदास रोड, शिवसेना शाखा, पारसी पंचायत रोड, पंपहाऊस सब-वे, आघाडीनगर, शेर-ए-पंजाब, गुरुद्वारा सर्कल, शांतीनगर, हॉली फॅमिली स्कूल, चकाला वजन काटामार्गे पारशीवाडा स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल.

प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी, लढवय्या शिवसैनिकाचे जाणे धक्कादायक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या शिवसैनिक, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रमेश लटके यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, आमदार रमेश लटके लढवय्या शिवसैनिक होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती. त्याच जोरावर ते आता सलग दोनदा अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. चांगला संपर्क असणारा, विकासकामांचा ध्यास घेतलेला, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. त्यांचे अकाली निधन हा त्यांच्या कुटुंबीयांवर आघात आहे. लटके कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रमेश लटके यांना श्रद्धांजली वाहिली.