
रुपयाचा नीचांक आणि महागाईचा उच्चांक अशा त्रांगडय़ात देशाची अर्थव्यवस्था अडकली आहे. त्यावर उपाय करण्याऐवजी चुकीचा राष्ट्रवाद आणि धर्मवादाचे भोंगे वाजविले जात आहेत. धार्मिक तणाव आणि ध्रुवीकरणाच्या गुंगीत जनतेला ढकलण्याचे उद्योग सुरू आहेत. इतर सर्व विषयांवर तोंड फाटेस्तोवर बोलणारे सत्ताधारी उच्चांकी महागाईवर मात्र सोयिस्कर मौन बाळगून आहेत. महागाईवर कधी तोंड उघडणार ते आधी सांगा! की दरवाढीसाठी रशिया-युक्रेनकडे जसे बोट दाखविले तसे आता अमेरिकेतही महागाईने 40 वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे, असे तर्कट सांगून जबाबदारी झटणार आहात आणि सामान्य माणसाला महागाईच्या ‘वाऱयावर’ सोडून देणार आहात?
केंद्रीय अर्थमंत्र्यांना जरी आपल्या देशातील महागाई ‘खूप’ वाटत नसली तरी सध्या देशातील महागाईने आठ वर्षांतील उच्चांक गाठला आहे, असे त्यांच्याच सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागातर्फे गुरुवारी जी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार एप्रिलमध्ये महागाईने 7.79 टक्के एवढा विक्रमी दर गाठला आहे. मार्च महिन्यातदेखील हा दर 17 महिन्यांतील उच्चांकीच होता. जानेवारी महिन्यापासूनच हा दर 6 टक्क्यांच्या खाली आलेला नाही. एप्रिल हा सलग चौथा महिना आहे की, रिझर्व्ह बँकेने घालून दिलेली 6 टक्क्यांची मर्यादा महागाईने ओलांडली आहे. महागाई नियंत्रणाबाहेर राहिल्यानेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांनी अलीकडेच आणीबाणीची बैठक घेऊन रेपो दरात 0.40 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती एवढी गंभीर असूनही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत असताना, महागाईचा 6.9 टक्के हा दर खूप जास्त नाही असे म्हटले होते. मग आता हा दर आणखी किती वाढला म्हणजे केंद्र सरकारला ती खरी महागाई वाटणार आहे? मुळात आता जो महागाईचा आगडोंब उसळला आहे त्याला जशी इंधन दरवाढ कारणीभूत आहे तशी
अन्नधान्य व खाद्यतेलांची दरवाढही
जबाबदार आहे. इंधनाचे दर शंभरीपार, घरगुती स्वयंपाकाचा गॅस हजाराच्या उंबरठय़ावर गेला आहे. त्यात डाळींचे दरदेखील किलोमागे 22 ते 36 रुपयांनी वाढले आहेत. चणाडाळ सोडली तर सगळय़ाच डाळींनी किलोसाठी 120 रुपयांचा पल्ला गाठला आहे. किरकोळ बाजारातील डाळींची ही दरवाढ थेट 40 ते 45 टक्के एवढी भयंकर आहे. ही महागाई नियंत्रणात आणण्याचा उपाय म्हणून रेपो दरातील वाढीकडे पाहिले जात असले तरी त्याचेही दुष्परिणाम होणारच आहेत. त्यामुळे कर्ज तर महागलेच, परंतु कर्जाची मागणीही कमी होऊ शकते किंवा कर्जवसुलीवर परिणाम होऊ शकतो. शिवाय कर्ज महागल्याने मोठय़ा उद्योगांवरील आर्थिक बोजा वाढणार, त्यामुळे उत्पादन आणि सेवा महाग होणार व ग्राहकांची क्रयशक्ती कमी होईल. त्यामुळे कोरोनानंतर रुळावर येत असलेले अर्थव्यवस्थेचे गाडे पुन्हा मंदावण्याचा धोका आहे. आपली अर्थव्यवस्था कशी वेगाने धावते आहे हे दाखविण्यासाठी जीएसटी संकलनाचे विक्रमी आकडे सरकारतर्फे फेकले जात आहेत, पण महागाईच्या उच्चांकाचे काय? त्यात आता रुपयादेखील अचानक घसरला. त्याचाही
वाईट परिणाम
अर्थव्यवस्था आणि परकीय गंगाजळीवर होणार हे उघड आहे. म्हणजे इकडे सामान्य माणसाचे बजेटही कोलमडले आहे आणि तिकडे देशाची अर्थव्यवस्थादेखील त्याच मार्गावर आहे. आपला देश आणि सामान्य माणूस एका विचित्र कोंडीत सध्या फसला आहे. आधी नोटाबंदी, नंतर जीएसटी, मग कोरोना आणि आता महागाई असे तडाख्यांवर तडाखे बसत आहेत. उत्पन्न मर्यादित आणि महागाई मर्यादेबाहेर अशा कोंडीत सामान्य माणसाचा श्वास गुदमरला आहे. रुपयाचा नीचांक आणि महागाईचा उच्चांक अशा त्रांगडय़ात देशाची अर्थव्यवस्था अडकली आहे. त्यावर उपाय करण्याऐवजी चुकीचा राष्ट्रवाद आणि धर्मवादाचे भोंगे वाजविले जात आहेत. धार्मिक तणाव आणि ध्रुवीकरणाच्या गुंगीत जनतेला ढकलण्याचे उद्योग सुरू आहेत. इतर सर्व विषयांवर तोंड फाटेस्तोवर बोलणारे सत्ताधारी उच्चांकी महागाईवर मात्र सोयिस्कर मौन बाळगून आहेत. महागाईवर कधी तोंड उघडणार ते आधी सांगा! की दरवाढीसाठी रशिया-युक्रेनकडे जसे बोट दाखविले तसे आता अमेरिकेतही महागाईने 40 वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे, असे तर्कट सांगून जबाबदारी झटणार आहात आणि सामान्य माणसाला महागाईच्या ‘वाऱयावर’ सोडून देणार आहात?





























































