
>> प्रदीप म्हात्रे
94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ वैज्ञानिक आणि साहित्यिक प्रा. जयंत नारळीकर यांची निवड झाली. त्यानिमित्ताने साहित्याच्या व्यासपीठावर विज्ञानाला स्थान मिळालं. आता हा उल्लेख येथे करायला त्यामागे कारणही तसंच आहे. मराठी विज्ञान परिषद या संस्थेची स्थापना झाली, ती ‘विज्ञानाला स्वतंत्र व्यासपीठ हवं’ या जाणिवेतून. या संस्थेची स्थापना करणाऱया म. ना. गोगटे यांचे अलीकडेच पुण्यात निधन झालं. मधुकर नारायण तथा म.ना. गोगटे यांचा 10 जन्म सप्टेंबर 1932 रोजी मुंबईत झाला. त्यांचे इंटरपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करत पदव्युत्तर शिक्षण लंडनच्या विद्यापीठातून घेतले.
1962 ते 1966 या कालावधीत मुंबई मराठी साहित्य संघात ते कार्यरत होते. त्यादरम्यान शास्त्र्ााrय साहित्य समितीच्या कार्यवाहपदी असताना शास्त्र्ााrय संमेलनाचे आयोजन करत स्मरणिका प्रकाशित केली. ‘परिभाषेचा परिचय’ ही वर्तमानपत्रीय मालिका, ‘मातीची धरणे’ या पुस्तकाचे प्रकाशन, हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘युद्धशास्त्र्ा’ या व्याख्यानमालेचे आयोजन असे नानाविध उपक्रम त्यांनी केले. ते करत असताना विज्ञानाला स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्याची कल्पना त्यांना सुचली. डॉ. रा. वि. साठे, डॉ. श्री. शां. आजगावकर, ज.ग. बोधे, प्रा. प. म. बर्वे यांसारख्या तत्कालीन समविचारी आणि समाजातील प्रतिष्ठत व्यक्तींच्या सहकार्याने मराठी विज्ञान परिषदेची स्थापना 24 एप्रिल 1966 रोजी केली. संस्था स्थापनेनंतर विज्ञानविषयक कार्यक्रम आयोजित करण्याचा अनुभव गाठीशी होता. त्या जोरावर एकीकडे कायदेशीर बाबींची पूर्तता करताना पहिल्याच वर्षी विज्ञान संमेलनाचे आयोजन केले (ही बाब म्हणावी तितकी सोपी नव्हती). पुढे जाऊन संस्थेकरिता जागा मिळवण्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा केल्यामुळे त्यालाही यश मिळाले. 1983 साली सरकारकडून मिळालेल्या भूखंडावर, जे प्राथमिक बांधकाम झाले, ते त्यांच्याच कारकीर्दीत. त्यामुळे संस्थेला स्थैर्य प्राप्त होत गेलं. आताची दुमजली वास्तू त्याचीच साक्ष देते.
इंटर सायन्सला असताना ‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ हे पुस्तक अभ्यासाला असल्याने त्याचा प्रभाव कायम होता. त्यामुळे व्यवसायाकरिता इंग्रजीचा वापर त्यांनी केला असला तरी त्यांची मराठी भाषेशी नाळ जुळलेलीच राहिली. त्यांना भाषेची असलेली आवड, त्यांनी सुरू केलेल्या वार्षिक निबंध स्पर्धा तसेच विज्ञानरंजन कथा स्पर्धा या उपक्रमांमध्ये प्रतिबिंबित होते. त्यातूनच विज्ञान कथा स्पर्धेत भाग घेत डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोडके, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे अशी कितीतरी मंडळी नावारूपाला आली. संमेलनाबरोबरच ‘पत्रिका’ हासुद्धा त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषय होता. परिषदेच्या शाखांमध्ये होणाऱया कार्यक्रमांची माहिती, देवाण-घेवाण या उद्देशाने सुरू झालेल्या वार्तापत्राचं रूपांतर कालांतराने विज्ञान मासिकांत झालं. त्यामध्येही गोगटेंचे योगदान निर्विवाद म्हणावं लागेल. त्याकरिता त्यांनी प्रासंगिक लिखाण केलं होतं. त्यांचा उत्साह इतका दांडगा होता की, सन 2002-2003 दरम्यान पत्रिकेकरिता त्यांनी बाबूराव शिर्के, अरुण फिरोदिया आणि रघुनाथराव चितळे यांसारख्या नामवंत उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या. परिषदेच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी शाखा स्थापन झाल्या, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे शाखांना स्वायत्तता देत त्यांचे रूपांतर विभागांमध्ये करावे लागले. यामागे गोगटे यांचे द्रष्टेपण जाणवते. 1997 पासून पुण्यात स्थायिक झालेले गोगटे मविप-पुणे विभागाशी संलग्न राहिले. इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअर्स, महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्याशी संयुक्त विद्यमाने होणाऱया कार्यक्रमात त्यांनी कळीची भूमिका बजावली.
विज्ञानाच्या स्वतंत्र व्यासपीठाचा ध्यास घेतलेल्या म.ना.गोगटे यांनी ज्येष्ठ साहित्यिका दुर्गाबाई भागवत यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून प्रा. जयंत नारळीकरांच्या विज्ञान कथांचं केलेलं जाहीर कौतुक आणि प्रा. जयंत नारळीकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड हे वर्तुळ पूर्ण होताना पाहिलं, यासारखं भाग्य कोणत्या संस्थापकाला लाभतं?






























































