16 ‘सीईटी’साठी 10 लाखांच्या घरात नोंदणी , राज्यांतर्गत सीईटीची नोंदणी जूनपर्यंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीईटी सेलच्यावतीने घेण्यात येणाऱया विविध 16 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी राज्यभरातून तब्बल 9 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर 1 लाख 66 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण अवस्थेत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेले 8 अभ्यासक्रम वगळता सर्वच सीईटीसाठी नोंदणीची मुदत आता संपलेली आहे.

सीईटी सेलकडून तंत्रशिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालय आणि कला संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱया विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 16 सीईटी घेतल्या जातात. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्त्र्ा, कृषी अशा पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया एमएचटी-सीईटीसाठी 6 लाख 6 हजार 142 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

यामध्ये पीसीबी ग्रुपसाठी 3 लाख 24 हजार 783 तर पीसीएमसाठी 2लाख 81 हजार 359 इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याखालोखाल एमबीए 1 लाख 37 हजार, बीएड 65 हजार 846, एलएलबी तीन वर्षे 62 हजार, एलएलबी पाच वर्षे 21 हजार अशी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वात कमी नोंदणी ही बी.प्लानिंग 30, एम.एचएमसीइटी 41, एम आर्च 839 या अभ्यासक्रमांना झाली आहे.