
- प्रसाद वि. प्रभू
युक्रेनचे नागरिक आणि लष्कर रशियाशी कसे लढत आहेत हे तैवान लक्षपूर्वक पाहत आहे आणि त्यादृष्टीने चीनविरुद्ध लढण्याची तयारी करीत आहे. यासंदर्भात तैवान लष्कर आणि प्रशासनाच्या सतत बैठका, चर्चा सुरू आहेत. तैवानी नागरिकांनाही लष्करी प्रशिक्षण देण्याचे ठरले आहे. युक्रेनी नागरिकांप्रमाणे तैवानी नागरिकही मोलोटोव कॉकटेल तयार करण्याच्या कामाला लागले आहेत असे वृत्त स्थानिक मीडियाने दिलेले आहे. भविष्यात काय होईल हे आताच सांगता येणार नाही, पण बलाढय़ चीनपासून बचाव करण्यासाठी ‘छोटय़ा’ तैवानची मोठी धडपड सुरू आहे हे नक्की!
‘सीटीएस’ या एका तैवानी दूरदर्शन वाहिनीवर सकाळी सात वाजता सावधगिरीचा इशारा देणारी बातमी 21 एप्रिल 2022 रोजी झळकली आणि तैवानमध्ये खळबळ माजली. या बातमीमध्ये असे सांगितले जात होते की, स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार चिनी सशस्त्र्ा दलाने तैवानवर आक्रमण सुरू केले असून राजधानी तैपेईभोवतालच्या शहरांवर आणि बंदरांवर क्षेपणास्त्र्ाs डागली जात आहेत. तैपेई बंदरावरील नौदलाच्या नौकांचा नाश केला जात आहे. बांकिओ स्टेशन येथे स्फोटकांचा वापर करून आग लावण्यात आली, पण जीवितहानी झालेली नाही. आपला देश युद्धाच्या उंबरठय़ावर असून चायनीज कम्युनिस्ट पार्टीने आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारले आहे. देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे, पण तासाभरातच सीटीएस वाहिनीने या बातमीसंदर्भात त्वरित खुलासा केला आणि माफी मागितली. युद्ध सुरू झाल्यास कसे तत्पर, सजग, सावध राहावे यासाठी नकली कवायत, तालीम घेण्यात आली होती. त्याची एक व्हिडीओ क्लिप तयार करण्यात आली होती आणि हीच व्हिडीओ क्लिप सीटीएस दूरदर्शन वाहिनीवर बातमीस्वरूपात झळकली. हे सारे अपघाताने, अनावधानाने झाले. नागरिकांना जो मनस्ताप झाला त्याबद्दल आम्ही माफी मागतो, असे सीटीएस वाहिनीने जाहीर केले. या वाहिनीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी तैवानमध्ये झाली, पण तैवानच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या वाहिनीला केवळ समज देऊन सोडले. वार्षिक आपत्तीविरोधी कवायतीसाठी ‘द न्यू तैपेई फायर डिपार्टमेंट’ने ही नकली कवायत आयोजिली होती. या नकली कवायतीची व्हिडीओ क्लिप तयार करण्यासाठी संबंधित डिपार्टमेंटने तैवानमधील अनेक दूरदर्शन वाहिन्यांना निमंत्रण दिले होते. त्यापैकीच ‘सीटीएस’ ही एक वाहिनी होती.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीन तातडीने आक्रमण करेल अशी धास्ती तैवानमध्ये वाढली आहे. तैवानी स्थानिक मीडियामध्ये ‘आज युक्रेन, उद्या तैवान’ असे मथळे वारंवार झळकत आहेत. इतकी वर्षे तैवानमध्ये चिनी धमक्यांना नागरिक फारसे गांभीर्याने मनावर घेत नव्हते किंवा त्याकडे दुर्लक्ष करीत होते, पण युक्रेन युद्धामुळे आता ‘जैसे थे’ परिस्थिती राहिलेली नाही, अशी त्यांची भावना झालेली आहे. रशियाने जर युक्रेनविरुद्धचे युद्ध जिंकले तर चीन तैवानविरुद्ध आपल्या फौजांचा वापर करण्याची शक्यता वाढेल, असे तैवानी नागरिकांना वाटते. आम्ही गाफील राहू शकत नाही आणि शांतता काळात आम्ही युद्धाच्या आपत्तीसाठी तयारी केली पाहिजे, असे ‘सायबर वॉरफेअर’ आणि ‘मॉडर्न मिलिटरी सायन्स’वर प्रशिक्षण शिबिर घेतलेल्या तैवानच्या ‘द कुमा अकादमी’ने म्हटले आहे.
तैवान आणि चीन या दोघांचेही रशिया-युक्रेन युद्धाकडे डोळे लागून राहिले आहेत. युक्रेनचे नागरिक आणि लष्कर रशियाशी कसे लढत आहेत हे तैवान लक्षपूर्वक पाहत आहे आणि त्यादृष्टीने चीनविरुद्ध लढण्याची तयारी करीत आहे. युक्रेनप्रमाणे तैवानी नागरिकांनाही लष्करी प्रशिक्षण देण्याचे ठरले आहे. काही दिवसांपूर्वी तैवानी लष्कराने प्रथमच नागरी सुरक्षेवर एक छोटे हँडबुक प्रकाशित केले. युद्धाच्या वेळी नागरिकांनी कशा प्रकारे आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, यासंदर्भात या हँडबुकमध्ये मार्गदर्शन करण्यात आले आहे. स्मार्टफोनचा वापर करून निवारास्थाने (बॉम्ब शेल्टर) कशी शोधावीत, पाणी आणि अन्न कुठे मिळू शकेल, प्रथमोपचाराचे साहित्य कुठे आणि कसे ठेवावे, वगैरे अनेक बाबतीत मार्गदर्शन आणि सूचना करण्यात आलेल्या आहेत. युक्रेनी नागरिकांप्रमाणे तैवानी नागरिकही मोलोटोव कॉकटेल तयार करण्याच्या कामाला लागले आहेत असे वृत्त स्थानिक मीडियाने दिलेले आहे. आक्रमण झाल्यास चीनविरुद्ध लढण्याचा निर्धार 77 टक्के तैवानी नागरिकांनी व्यक्त केल्याचे ‘तैवान सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडीज’ या संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे, पण युक्रेनप्रमाणे बेचिराख होण्यापेक्षा चीनशी चर्चा आणि संवादाद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असाही एक मतप्रवाह तैवानमध्ये आहे. कारण तैवान हा प्रगत देश असून जगाला 60 टक्के सेमीकंडक्टर चिपचा पुरवठा तो करतो. स्मार्टफोन, ऑटोमोबाईलपासून सर्व इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये सेमीकंडक्टर चिपची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. चीनमध्ये 20टक्के सेमीकंडक्टरची निर्मिती होते. तैवानचे चीनमध्ये विलीनीकरण झाल्यास जगात सेमीकंडक्टर चिपच्या निर्मितीच्या बाबतीत चीनची मत्तेदारी निर्माण होईल.
सध्या जगातील फक्त आठ छोटय़ा आणि किरकोळ देशांचा तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा आहे. अमेरिकेचे तैवानशी औपचारिक राजनैतिक संबंध नाहीत, तरीसुद्धा (तैवान रिलेशन ऍक्ट) या कायद्यानुसार अमेरिका तैवानला स्वसंरक्षणात मदत करण्यास बांधील आहे. तैवानला शस्त्र्ापुरवठा मुख्यत्वेकरून अमेरिकेकडून होतो. त्याचप्रमाणे तैवान हा अमेरिकेचा नववा मोठा व्यापारी भागीदार आहे. हजारो तैवानी विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जात असतात. इतर देश चीनच्या दडपणामुळे तैवानपासून अंतर राखून आहेत. जागतिक आरोग्य संघटना, युनो अथवा इतर कुठल्याच महत्त्वाच्या जागतिक संघटना, संस्थांमध्ये चीनमुळे तैवानला स्थान नाही. गेल्या वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन विराजमान झाल्यावर त्यांनी अब्जावधी डॉलर्सची शस्त्र्ाास्त्र्ाs तैवानला देण्याची घोषणा केली आहे.
1995 मध्ये तैवानवर आक्रमण करण्याची योजना चीनने आखली होती तेव्हा तैवान सामुद्रधुनीलगत असलेल्या चीनच्या फुजिआन प्रांतात हजारो चिनी सैनिक जमा झाले होते, पण त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अमेरिकन युद्धनौका पाठवल्यामुळे संघर्ष टाळला होता. तेव्हापासून चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका युद्धात उतरेल असे म्हटले जात होते, पण आता 2022 मध्ये तशी शक्यता राहिलेली नाही. त्यामुळे युक्रेनप्रमाणे तैवानलाही अमेरिका वाऱयावर सोडून देईल अशी भीती तैवानी जनतेला वाटत आहे. तैवानच्या अध्यक्षा त्साई इग वेन यांनीही तशी भीती व्यक्त केलेली आहे. त्यांना धीर देण्यासाठी अलीकडेच अमेरिकन प्रतिनिधी विभागाच्या सभापती नॅन्सी पलोसी यांनी तैवानचा दौरा केला होता, त्याला चीनने तातडीने आक्षेप घेतला होता. याचदरम्यान अमेरिकेने प्रथमच आपली मरीन कमांडो तुकडी तैवानमध्ये पाठवून तैवानी मरीन कमांडोंना प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला होता.
तैवानमध्ये 2000 साली लोकशाही आली आणि तत्कालीन अध्यक्ष चेन युई बियान यांनी तैवानच्या स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला. त्यानंतर 2016 साली अध्यक्षपदी निवडून आलेल्या त्साई इंग वेन यांनी तैवान आधीपासूनच स्वतंत्र देश आहे आणि तो स्वतंत्रच राहणार असे जाहीर केले. तेव्हापासून चीन आणि तैवान यांच्यातील संबंध खूपच ताणले गेले आहेत. ‘एक देश, दोन व्यवस्था’ असा फॉर्म्युला चीनने तैवानसमोर ठेवलेला होता, पण तो तैवानने मान्य केला नाही.
तैवान बेटसमूह चीनच्या मुख्य भूमीपासून केवळ शंभर मैल अंतरावर आहे. तैवानची लोकसंख्या साधारण अडीच कोटी आहे, तर लष्करी बळ साधारण दीड लाख आहे. याउलट एक अब्ज 40 कोटी लोकसंख्या असलेल्या चीनचे लष्करी बळ वीस लाखांवर आहे. त्यामुळे इवलासा तैवान बलाढय़ चीनशी किती दिवस लढणार?, तैवानसाठी अमेरिका थेट युद्धात उतरेल का? तसे झाल्यास पुन्हा विश्वयुद्ध होईल का? चीन थेट युद्ध न करता इतर मार्गांनी तैवानला गिळंकृत करेल का? वगैरे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तैवान हा अमेरिकेच्या प्रतिष्ठsचा मुद्दा बनलेला आहे. अमेरिकेने आपले आरमार प्रशांत महासागरात पाठवून व दक्षिण चीन समुद्रातील इतर देश व ऑस्ट्रेलियाला साथीला घेऊन चीनवर दडपण आणलेले आहे. मात्र चीनने पुढे-मागे तैवानवर कब्जा केलाच तर महासत्ता म्हणून अमेरिकेचे एक पर्व समाप्त होईल असे बोलले जात आहे. भविष्यात काय होईल हे आताच सांगता येणार नाही, पण बलाढय़ चीनपासून बचाव करण्यासाठी ‘छोटय़ा’ तैवानची मोठी धडपड सुरू आहे हे नक्की!
चीन आणि तैवान यांच्यातील नेमका वाद काय आहे हे थोडक्यात समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. चीनवर वेगवेगळी चिनी राजघराणी, नेदरलँडस्, स्पेन, जपान यांसारख्या देशांचे अधिपत्य होते, पण नंतर क्रांतिकारकांनी चीन एकसंध केला. 1912 ते 1949 या कालावधीत चीन ‘द रिपब्लिक ऑफ चायना’ म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी तैवान जपानच्या ताब्यात होता. 1945 मध्ये दुसऱया महायुद्धामध्ये जपानने शरणागती पत्करल्यानंतर चीनने तैवानवर अधिकार सांगण्यास प्रारंभ केला. चीनमधील यादवी युद्धामध्ये तत्कालीन चिनी नेते चियांग काय शेक यांच्या कोमिटांग फौजांचा माओच्या कम्युनिस्ट फौजांनी पराभव करून चीनच्या मुख्य भूमीतून पळवून लावल्यावर चियांग काय शेक तैवान बेटावर आले व त्यांनी तेथे ‘रिपब्लिक ऑफ चायना’ या नावाने 40 वर्षे कारभार केला. दरम्यान, माओ झेडांग यांनी 1 ऑक्टोबर 1949 रोजी ‘द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ म्हणजेच ‘चीन’च्या स्थापनेची घोषणा केली, पण चीनचे खरे सरकार आपलेच आहे असा शेक यांचा दावा होता. 1971 मध्ये युनोने शेक यांच्या ‘द रिपब्लिक ऑफ चायना’ची मान्यता काढून घेतली आणि माओंच्या कम्युनिस्ट चीनला ‘देश’ म्हणून अधिकृतरीत्या मान्यता दिली. अमेरिकेची भूमिकाही युनोप्रमाणेच आहे, तर आपण आधीपासूनच स्वतंत्र देश आहोत अशी तैवानची भूमिका आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)



























































