कविता मनामनातली – अंत:स्वर जपत भिडणारी कविता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • गीतेश शिंदे

कवितेतला आशय वाचकांपर्यंत पोहोचवताना तिची वस्तुनिष्ठ चिकित्सा करणं जितकं गरजेचं तितकंच तिची अभिव्यक्ती जाणणंही गरजेचं. ही अभिव्यक्ती परीक्षणाच्या माध्यमातून मांडणारं हे सदर.

करोडो वर्षांच्या पृथ्वीच्या इतिहासात अनेक जीवजंतू, पशुपक्षी जन्माला आले. काही कालौघात नष्टही झाले. ज्यांच्यात परिस्थितीनुरूप बदल घडले ते टिकून राहिले, परंतु या ब्रह्मांडात शाश्वत असे काहीच नाही. आदिमानव ते मानव या उक्रांतीत महत्त्वाचा टप्पा म्हणजे दोन पायांवर ताठ कण्याने चालू लागण्याचा. कवितेच्या बाबतीतही असे अनेक महत्त्वाचे टप्पे आले. मग ते संत वाङ्मयापासून पंत कविता असो वा सध्याच्या काळात रुळलेल्या आधुनिक कवितेपर्यंत, कवितेची शैली, मांडणी व व्यक्त होण्याच्या पद्धती या सर्व बाबतीतही कविता बदलते आहे. या आवाजी काळात आपला आतला आवाज टिकवून ठेवत अक्षरांच्या रूपाने तो ठामपणे उच्चारणारे काही कवीही आपले लक्ष वेधून घेतात. त्यातलेच एक मुख्य नाव म्हणजे कवी प्रफुल्ल शिलेदार. 1993 ला ‘स्वगत’ व पुढे 2006 साली आलेल्या ‘जगण्याच्या पसाऱयात’ या दोन कवितासंग्रहानंतर पॉप्युलर प्रकाशनाकडून 2017 साली प्रसिद्ध झालेला ‘पायी चालणार’ हा शिलेदारांचा तिसरा कवितासंग्रह. कवितेसोबतच एक उत्तम अनुवादक अशी त्यांची दुहेरी ओळख असली तरी आपल्या कवितेच्या अंतःस्वराबद्दल ते तितकेच सजग असल्याचे त्यांच्या काव्यविषयक भूमिकेमुळे जाणवते. त्यामुळेच पाच वर्षांनतरही ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहातील कविता विरून जाणाऱया न वाटता टिकून राहण्याबद्दल विश्वास निर्माण करतात.

‘पायी चालणार’ (पृ. क्र. 104) या शीर्षक कवितेत शिलेदार सुरुवातीलाच लिहितात,

कोटय़ावधी वर्षांच्या
प्रयत्नानं साधलेलं

ताठ उभं राहून पायी चालणं

मुश्कील होण्याच्या काळात

मी जगतो आहे

पायाखाली भरभक्कम उभी राहणारी माती

खचता खचता

इथे कवीला फक्त उक्रांतीत मिळालेले चालणे वा उभे राहणे सुचवायचे नसून सदसद्विवेकाची, नीतिमूल्यांची माती खचत असताना आलेले भयावह जगणे, टिकून राहणे किती जिकिरीचे होऊन बसलेय हे अधोरेखित करायचे आहे. सर्वात बुद्धिमान प्राण्याचे जे बिरुद आपणच स्वतःला चिकटवून घेतलेय, त्याचा अहंभाव इतक्या प्रमाणात वाढलाय की, पृथ्वीवरील इतर सजीव हे आपले सहचर आहेत हेच सोयीनुसार विसरलोत. पृथ्वीचा सातबारा आपल्याच नावावर असल्यासारखा माणूस वागतोय त्याला ही पृथ्वी एका थुकदाणीसारखी वाटतेय असे कवी म्हणतो,

तर रस्ताभर थुंकीच पडलेली दिसते

कालची परवाची आजची आत्ताची थुंकी

(पृ. क्र. 106)

शक्यतो आपल्या नजरेस न पडणाऱया सजीव सृष्टीबद्दल ‘राहू देतो कित्येकांना सोबत’ (पृ. क्र. 11) या कवितेतून कवी एक जाणीव करून देतो. भवतालच्या या सर्व कोलाहलाने कवीचा आत्मा तळमळत राहतो. नेमका बेचकीत अडकल्याप्रमाणे काहीतरी घडत वा बिघडत असताना कवी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे तिथे हजर होतो. मग ती दंगल असो वा मोर्चा. कवीला जमाव घेराव घालतो, पण त्याला काहीच आठवत नसते. त्याच्यातून एक जखम सदैव भळभळत असते. ‘कधीच नव्हते सोपे’ या कवितेत शिलेदार लिहितात,

कवीच्या मस्तकावर
झाली आहे जखम

त्यातून भळभळणारी भाषा

व्याकरणाचे नियम तोडते आहे (पृ. क्र. 3)

मुंगी हा इवलासा जीव, ज्याची कोणतीच दखल आपल्या लेखी नसते, पण संग्रहातील ‘मुंगी’ व ‘जोखीम पत्करून’ या दोन कवितांतून मुंगी आपले लक्ष वेधून घेते. कविता लिहीत असताना कवीची समाधी या मुंगीमुळे भंगल्याने तो सहजपणे, अगदी कोणताही विचार न करता पेनाच्या साहाय्याने तिला चिरडून टाकतो. कारण मुंगीला कोणतेही उपद्रवमूल्य नसल्याने तिच्या निर्घृण हत्येने मुंग्यांचे लोंढे ना अंगावर धावून येणारेत ना कोणत्या जातीधर्माच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. खरं तर संघटित होणे, सूड घेणे हे माणसांचे गुणधर्म मुंग्यांना लागू नाहीत, पण तिला कदाचित लेखकाच्या साहित्यकृतीतील  एखादे अक्षर व्हावेसे वाटत असावे किंवा तिला कवीकडूनच खूप अपेक्षा असाव्यात. म्हणूनच ती कवीच्या टेबलावर येते.

ती जुन्या डिक्शनरीतला विस्मृतीत गेलेला शब्द

साखरेच्या दाण्यासारखा उचलून

आणून देऊ शकत नाही मला

कवितेत वापरण्याकरता…  (पृ. क्र. 80)

विकासाचे गोंडस नाव देऊन प्रचंड प्रमाणात मनुष्य निसर्गाला हानी पोहोचवत आहे. त्यासाठी डोंगर पोखरला जातोय, नदी उपसून तिच्या पोटातील वाळू उपसली जातेय, विकास प्रगतीपथावर धावतोय, पण त्याचवेळी निसर्ग आचके घेतोय. रस्ते कसे (पृ. क्र. 19) या कवितेत आत्मकेंद्री मनुष्याच्या स्वार्थी मनोवृत्तीचा वेध अचूकपणे घेतला आहे, तर ‘हद्दपार’ (पृ. क्र. 34) या कवितेत बारा हजार मीटर उंचीवर जेटच्या अजस्र पोटात वावरताना कवी तटस्थपणे पृथ्वीकडे पाहतो तेव्हा नोंदवलेल्या या ओळी पहा ः

नदीच्या चमचमत्या धाग्यानं शिवलेली

असंख्य तुकडे जोडलेली 

पृथ्वीवर अंथरलेली गोधडी न्याहाळतोय

पुस्तकांचा सर्वच इतिहास अत्यंत सुखावह नाही. छापील स्वरूपातील साहित्याकडे नेहमीच गांभीर्याने पाहिले गेले आहे. कारण त्यात व्यवस्थेला आव्हान देण्याची वा वेळ पडल्यास ती उलथवून लावण्याचीही शक्ती असते. त्यामुळेच तर पुस्तकांवर बंदी घातली जाते, त्यांच्या प्रती जाळल्या जातात, गाथाच बुडवली जाते वा लेखकावर जीवघेणे हल्लेही होतात. कारण वस्तुनिष्ठ विचार पचवणे समाजाला नेहमीच जड जाते. म्हणूनच कवीकडून ही बाब नोंदवली गेली असावी.

पुस्तकं निःशस्त्र असतात

मात्र पुस्तकांवर हल्ले होण्याचा

इतिहास जुनाच

या कवितांव्यतिरिक्त वाघ, पुरुषोत्तमदास या कविताही मनात रेंगाळतात. ‘पायी चालणार’ या एकूण 52 कविता असलेल्या संग्रहातील कविता आपला निर्मम अंतःस्वर जपत समग्रतेशी भिडणाऱया आहेत असे ठामपणे म्हणावेसे वाटते. या कविता विषयाभोवती रचलेल्या नसून आशयकेंद्री आहेत व त्या आशयातही बहुविधता असून त्यांना प्रतिमा, प्रतीकांचा सोस नाही. मुक्तछंदातून थेटपणे भवतालावर त्या भाष्य जरी करत असल्या तरी त्या भाष्य कविता वा टीकात्मक स्वरूपाच्या नाहीत. किंबहुना, आपणही या समाजाचा हिस्सा आहोत व त्या बऱयावाईटाला जबाबदार आहोत याचे भान असणाऱया त्या आहेत.

पायी चालणार (कवितासंग्रह)

कवी ः प्रफुल्ल शिलेदार

प्रकाशक ः पॉप्युलर प्रकाशन

पृष्ठs ः 120, मूल्य ः रुपये 175/-