
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील तरुणाचा कंदुरीच्या कार्यक्रमात पत्रावळी उचलण्याच्या कारणावरून खून झाला असून पारध पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले.
या संदर्भात सविस्तर असे की,जालना जिल्ह्यातील वाकडी येथील जगन भाऊराव सिरसाठ यांचा शुक्रवारी सारोळा पीर (ता.सिल्लोड) येथे कंदुरीचा कार्यक्रम होता. त्या निमित्त वाकडी येथील त्यांच्याच भावकीतील सुनील दादाराव सिरसाठ (30) हा सकाळी 11 वाजता कार्यक्रमासाठी सारोळा पीर येथे गेला.
या कंदुरीच्या पंगतीत संशयीत आरोपी सोमनाथ विनायक सिरसाठ (36, रा.वाकडी) याची आणि सुनीलची पंगतीतील पत्रावळ्या उचलण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचा राग मनात धरून सोमनाथ याने सुनील जेवण करून घरी वाकडी येथे जात असताना जानेफळ गायकवाड ते वाकडी रस्त्यावर त्याची मोटारसायकल आडवून त्याचा खाली खेचले आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केले. त्याच्या गुप्तांगालाही मारहाण करण्यात आली. ही बाब काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी सुनीलला सिल्लोड येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच सुनीलचा मृत्यू झाला.
मयत सुनील याचा भाऊ अंबादास सिरसाठ यांनी शनिवारी पारध पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी संशयित आरोपी सोमनाथ सिरसाठ याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे हे करत आहेत.
























































