
>> नीलेश कुलकर्णी
‘कर्नाटकात नेतृत्वबदल होणार नाही,’ असे स्पष्ट संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच कर्नाटक दौऱ्यात दिल्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या गोटात सध्या ‘बूम…बूम’चे वातावरण आहे. अर्थात भाजपची तेथील पुढची वाटचाल खडतरच राहणार आहे. माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक भाजपचे ज्येष्ठ नेते येडियुरप्पा यांच्याच लिंगायत समाजाच्या आयात बोम्मईंना भाजपश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदी नेमले असले तरी, बोम्मईंना राजकीय सूर गवसत नसल्याने भाजप टेन्शनमध्ये आहे. पक्षांतर्गत लाथाळ्या वाढल्या आहेत. त्यामुळेच अमित शहांच्या पुढय़ात सगळ्यांनी गाऱ्हाणी गायली. तथापि, तूर्त तरी पक्षश्रेष्ठींचे वजन बोम्मईंच्या पारडय़ात पडले आहे.
‘नेतृत्व परिवर्तन’ ही भाजपची खरी ताकद आहे, असे विधान कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदावर अनेक वर्षांपासून डोळा ठेवून असलेले पक्षाचे संघटनमंत्री बी. एल. संतोष यांनी केल्यामुळे कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बोम्मई यांना नारळ दिला जाणार, अशीच चर्चा कर्नाटकात रंगली होती. मात्र अमित शहा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. येडियुरप्पांची नाराजी दूर करणे, लिंगायत समाजात मेसेज देणे, त्याचबरोबर सरकारचे काम जनतेत पोहोचवणे, अशी तिहेरी कसरत भाजपपुढे आहे. बोम्मई हे वास्तविक कुशल प्रशासक मानले जायचे. मात्र भाजपतील गटातटाच्या राजकारणाने ते बेजार झाले आहेत. त्यामुळे प्रभावहीन मुख्यमंत्री (संतोष हे सुपर सीएम) अशा पद्धतीने कर्नाटकचा दुतोंडी कारभार सुरू आहे. अमित शहा यांनी कर्नाटकच्या दौऱ्यात त्यांच्या पक्षाची डागडुजी केली असली तरी कर्नाटकचे आव्हान मोठे आहे हे नक्की.
भाजपने आता कर्नाटकला धार्मिक ध्रुवीकरणाच्या खाईत लोटले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बोम्मई सरकारने जाणीवपूर्वक हिजाब प्रकरण पेटवले. कर्नाटक ही हिंदुत्ववादी राजकारणाची भाजपची नवी प्रयोगशाळा बनली. या प्रयोगशाळेतले प्रयोग राजकीयदृष्टय़ा पाचही राज्यांत भाजपच्या पथ्यावर पडले. कर्नाटकातील लिंगायत विरुद्ध वक्कलिंग हे परंपरागत राजकारणही त्यामुळे काही काळ पिछाडीवर पडले. धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणामागे त्याची फरफट झाली. मात्र हिंदु- मुस्लिम असे ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू असतानाच जातीय समरसताही जोपासणे भाजपला क्रमप्राप्त आहे. त्यातूनच बोम्मईंना जरी मुख्यमंत्री केले असले तरी लिंगायत समाजाचे त्यांना समर्थन नाही. आजही हा समाज येडियुरप्पांना आपला सर्वोच्च नेता मानतो. येडियुरप्पांवर भ्रष्टाचाराचा शिक्का मारून दिल्लीकरांनी त्यांना अडगळीत टाकल्याने या समाजात अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेची दखल घेऊन ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आहेत असे येडियुरप्पांचे चिरंजीव विजयेंद्र यांना दिल्लीकरांना मंत्री बनवावे लागेल, अशी चिन्हे आहेत. काँगेसी व धर्मनिरपेक्ष विचारसरणीत वाढलेल्या बसवराज बोम्मईंना भाजपच्या हिंदुत्ववादी ध्रुवीकरणाच्या ‘ड्रायव्हिंग सीट’वर बसावे लागत आहे. त्यामुळेच भाजपचा पुढचा प्रवास खडतर आहे. निवडणुका जवळ असल्याने बोम्मईंना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे व्यक्तिगतरीत्या बसवराज बोम्मईंचे ‘बूम बूम’ झाले हे खरे. मात्र भारतीय जनता पक्षाचे ‘बूम बूम’ होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. काँगेस व संयुक्त जनता दलाने राजकीय शहाणपण दाखविले तर येडियुरप्पांनी जिंकून दिलेले दक्षिणेतील पहिले भाजपचे राज्य भाजपच्या हातून निसटू शकते. अर्थात असे राजकीय शहाणपण कुमारस्वामी व कर्नाटकातील काँगेस पुढारी दाखवतील काय? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
सिद्धूंची सर्कस
सर्कशीतल्या ‘पात्रा’सारखी काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांची राजकीय अवस्था झाली आहे. सिद्धू महाशय भाजपातून मोठय़ा राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी काँग्रेसमध्ये गेले. तिथे कॅप्टन अमरिंदरसिंग यांना नड नड नडले. अमरिंदर यांना काँग्रेस सोडण्यासाठी बाध्य केले. अमरिंदर यांच्यानंतर आपल्यालाच संधी मिळेल, अशा भरवशावर सिध्दूंनी राजकारण केले. मात्र दिल्लीतून चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी नेमण्यात आल्यानंतर सिध्दूंनी केलेला थयथयाट सगळ्यांच्याच लक्षात आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव व्हावा, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असणारे सिध्दूच तन-मन-धनाने काम करत होते. काँग्रेस सत्तेतून बेदखल झाल्यानंतर सिध्दूंचीही प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे राजकीय अडगळीत पडलेल्या सिध्दूंनी पुन्हा मीडियात चर्चेत राहण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांची भेट घेऊन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मान यांची भेट घेऊन काँग्रेसवर दबाव वाढविण्याचा सिध्दूंचा प्रयत्न आहे. मात्र आता भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सिध्दू नावाचे दुखणे पुन्हा विकत घेतील, याची सुतराम शक्यता नाही. वास्तविक रोजेवाल यांनी आम आदमी पार्टी सोडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सिध्दू यांना आपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. मात्र सिध्दूंनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट निवडणुकीआधीच धरल्याने बोलणी फिस्कटली आणि अनपेक्षितपणे भगवंतसिंग मान यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. नशीब, नशीब म्हणतात ते हेच! विधानसभा निवडणुकीमध्येच सिध्दूंनी हरभजनसिंगलाही आपल्या राजकीय फिरकीच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. मात्र हरभजनची राजकीय समज सिध्दूंपेक्षाही उजवी ठरली. निवडणुका होईपर्यंत शांत राहणाऱ्या हरभजनची अनपेक्षितपणे राज्यसभेवर वर्णी लागली. ‘आप’कडून या दोन्ही संधी नवज्योत सिध्दू यांना मिळाल्या असत्या. पण उथळ स्वभाव व वाह्यात बडबड यामुळे सिध्दू यांनी आपल्या राजकीय करिअरचाच बट्टय़ाबोळ करून ठेवला आहे.
दिलदार बघेल!
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी एक विलक्षण कृती करून अनेकांची मने जिंकली आहेत. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये एक निकोप स्पर्धा व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांच्या सरकारने दहावी व बारावीच्या टॉपर्सना मोफत हेलिकॉप्टर सवारी करविण्याचा निर्णय घेतला. अशाच एका कार्यक्रमात बघेल गेलेले असताना, रघुनाथनगर येथील स्मृती नावाची दुसरीत शिकणारी चिमुरडी मोठय़ा धिटाईने मुख्यमंत्र्यांच्या पुढय़ात गेली आणि, ‘मै कब हेलिकॉप्टर में बैठुंगी?’ असा लडिवाळ सवाल या चिमुकलीने केला. त्यावर, ‘आप जब टॉपर बनेगी तब जरूर बैठेंगी,’ असे उत्तर देत बघेलांनी तिथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र ही चिमुकली निघाली महावस्ताद. ‘मुझे अभी हेलिकॉप्टर मै बैठना है,’ असा हट्टच तिने मुख्यमंत्र्यांपुढे धरला. मुख्यमंत्र्यांनीही मनाची दिलदारी दाखवत या चिमुकलीचा हट्ट पुरा केला. हा किस्सा सध्या छत्तीसगढमध्ये मोठा चर्चिला जात आहे. बघेल यांचे राजकीय व्यक्तिमत्त्वही त्यामुळे उजळून निघाले आहे. वास्तविक, बघेलांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यासाठी काँग्रेस अंतर्गत एक गट सक्रिय होता. त्यामुळे बघेलांचीही धाकधूक वाढलीच होती. मात्र राहुल गांधींनी ठाम भूमिका घेत भूपेश बघेल यांना राजकीय अभय दिले. एका चिमुकलीची छोटीशी इच्छा पूर्ण करून बघेलांनी एक नेक काम केले आहे हे नक्की.


























































