
राज्यातील किल्ले तसेच मंदिरांचा जीर्णोद्धार हा पुरातत्व विभागाच्या धोरणांमुळे रखडला आहे. या प्राचीन मंदिरे तसेच किल्ल्यांचा जीर्णोद्धार आवश्यक असून त्यासाठी आवश्यक सहकार्य केंद्र सरकार तसेच पुरातत्व विभागाकडून मिळावे, अशी मागणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केंद्रीय पर्यटनमंत्री किशन रेड्डी यांच्याकडे केली.
केंद्रीय पर्यटन विभागाच्या एका कार्यक्रमावेळी पर्यटनमंत्री अदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यटनमंत्री किशन रेड्डी यांच्यासोबत भेट झाली. या भेटीवेळी आदित्य ठाकरे यांनी मंदिर तसेच किल्ल्यांच्या जीर्णोद्धाराविषयी किशन रेड्डी यांच्यासोबत चर्चा केली. महाराष्ट्रातील 10 प्राचीन मंदिरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जीर्णोद्धार करण्याच्या आपल्या प्रयत्नांना केंद्राच्या पुरातत्व विभागाचेही आवश्यक सहकार्य मिळावे, अशी मागणी अदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे केली. यावर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आपला वारसा अधिक चांगल्या रीतीने जतन व्हावा यासाठी सहकार्य करण्याचे निर्देश पुरातत्व विभागाला दिले. यावेळी महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरिता आवश्यक उपाययोजनांबाबतही चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती पर्यटनमंत्री अदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे दिली.
महाराष्ट्रात पर्यटनवाढीसाठी सरकारचे प्रयत्न
महाराष्ट्रात पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सरकारने हॉटेल क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला. हॉटेलसाठी लागणाऱया परवान्यांची संख्या 70 वरून 10 वर करण्यात आली. पर्यटनासाठी बीच शॅक धोरण, साहसी पर्यटन अशा सरकारने घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांची माहिती केंद्रीय पर्यटनमंत्र्यांना राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

























































