
हिंदू संघटनांनी मशिदीमध्ये मंदिराचे अवशेष असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार वाराणसी येथील ज्ञानव्यापी मशिदीचे आज सलग दुसऱया दिवशी सर्वेक्षण करण्यात आले. 52 कर्मचाऱयांच्या टीमने सुमारे चार तास हे सर्वेक्षण केले. मात्र आजही हे सर्वेक्षण अपूर्ण राहिल्यामुळे उद्या, सोमवारी पुन्हा मशिदीमध्ये व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. दरम्यान, सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
ज्ञानव्यापी मशिदीमध्ये मंदिराचे अवशेष असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारपासून ज्ञानव्यापी मशिदीच्या व्हिडीओग्राफी सर्वेक्षणाला सुरुवात झाली. आज सलग दुसऱया दिवशीही सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हे सर्वेक्षण सुरू होते. मात्र या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्यामुळे उद्या पुन्हा सर्वेक्षण केले जाणार आहे.
हिंदू-मुस्लिम दोघांचाही दावा
ज्ञानव्यापी मशिदीचे आज सर्वेक्षणाचे काम झाल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी आमचा दावा मजबूत असल्याचा पुनरुच्चार केला. आमचा दावा आधीच मजबूत होता आणि आजच्या सर्वेक्षणामुळे तो अधिक मजबूत झाला, असा दावा हिंदू संघटनांनी केला. मात्र मुस्लिम संघटनेच्या पदाधिकाऱयांनी मीडियासमोर येत सर्वेक्षण करणाऱया टीमला आतापर्यंत कोणताही सबळ पुरावा मिळाला नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, जोपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत काहीच सांगणे योग्य होणार नाही, अशी भूमिका याच्याशी संबंधित वकिलांनी घेतली आहे.
ड्रोनने व्हिडीओग्राफी
ड्रोनच्या साहाय्याने आज मशिदीच्या घुमटांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर छत, मशिदीतील खोल्या, भिंती, व्हरांडा, तलाव यांची व्हिडीओग्राफी सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान, सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाला अलर्ट करण्यात आले असून पोलीस मार्च काढण्यात आला.
12 स्तरांची सुरक्षा व्यवस्था
सर्वेक्षणादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी सर्वेक्षण सुरू असलेल्या मशिदीबाहेर 10 स्तराची सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली होती. मात्र आज दुसऱया दिवशी त्यात अधिक वाढ करून ही सुरक्षा व्यवस्था 12 स्तरांची करण्यात आली आहे.

























































