
अनेक छोटय़ा-मोठय़ा कारणांमुळे घरातल्यांशी भांडून किंवा बॉलीवूडच्या आकर्षणामुळे लहान मुले आपल्या आईवडिलांचे घर सोडून मुंबईत नशीब अजमावण्यासाठी येत असतात. अशा मुलांना त्यांच्याशी गोड बोलून त्यांचा पत्ता मिळवीत रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी एनजीओ ‘चाइल्ड लाइन’ आणि ‘जीआरपी’ पोलिसांची मदत घेत पुन्हा त्यांच्या घरी पाठवीत असतात. अशा पद्धतीने गेल्या चार महिन्यांत 504 मुलांची मध्य रेल्वेच्या आरपीएफने सुखरूप सुटका करीत त्यांची पालकांशी भेट घडवून आणली.
आरपीएफने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत जानेवारी ते एप्रिल 2022 अशा गेल्या 4 महिन्यांत 504 मुलांची सुटका केली आहे. यात 330 मुले आणि 174 मुलींचा समावेश आहे. या मुलांना त्यांच्या पालकांकडे सुखरूपपणे सोपविल्याने मुले व पालकांच्या चेहऱयावरील आनंदाचे भाव पाहून रेल्वे सुरक्षा बलाच्या शिपायांना समाधान मिळत आहे. गेल्या चार महिन्यांत मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने 285 मुलांची सुटका केली आहे, त्यात 206 मुले तर 79 मुली आहेत. पुणे डिव्हिजनने 71 मुलांची सुटका केली असून त्यात 50 मुले तर 21 मुली आहेत. भुसावळ डिव्हिजनने 92 मुलांची सुटका केली असून त्यात 47 मुले तर 45 मुलींचा समावेश आहे. नागपूर डिव्हीजनने 32 मुलांना शोधले असून त्यात 12 मुले तर 20 मुलींचा समावेश आहे. सोलापूर डिव्हीजनने 24 जणांची सुटका केली असून त्यात 15 मुले तर 9 मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर 2021 मध्ये 971 मुलांची आरपीएफने सुखरूपपणे सुटका करून त्यांना पुन्हा त्यांच्या पालकांकडे पाठविले आहे. त्यात 603 मुले तर 368 मुलींचा समावेश आहे.
मनुष्य तस्करीच्या विरोधात एल्गार
रेल्वेने देशातून मनुष्य तस्करीचा प्रकार नष्ट करण्यासाठी ‘असोसिएशन फॉर व्हॉन्लेटरी ऍक्शन’ या संघटनेशी करार केला आहे. या संघटनेला बचपन बचाओ आंदोलनही म्हणतात. ही संघटना नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या चिल्ड्रन फाऊंडेशनशी संलग्न आहे. आरपीएफने मनुष्य तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी ‘ऍक्शन अगेन्स्ट ह्युमन ट्रॅफिकिंग’ ही मोहीमही उघडली आहे.

























































