ना बायकोला सोडणार ना प्रेयसीला, दोघींना वेळ विभागून देणार; 3 मुलांच्या बापाचा प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोघांच्या संसारात तिसरी व्यक्ती आली की नात्यात गुंता हा ठरलेलाच असतो. पण, त्यावर तोडगा म्हणून एखाद्याने भलताच प्रस्ताव दिला तर आश्चर्यचकित व्हायची वेळ येते. असाच काहीसा प्रकार आग्रा येथे घडला आहे.

येथील कौटुंबिक सल्ला केंद्रात एक विलक्षण प्रकरण निवाड्यासाठी आलं आहे. या प्रकरणात राज (नाव बदललेले) आणि त्याची बायको तसंच त्याची प्रेयसी यांचा समावेश आहे. राज याचं लग्न नेहा (नाव बदललेले) हिच्याशी दहा वर्षांपूर्वी झालं होतं. या जोडप्याला तीन मुलं आहेत. राज एका खासगी कंपनीत नोकरी करतो.

काही वर्षांपूर्वी राज आणि नेहाचं भांडण झालं आणि नेहा माहेरी निघून गेली. तेव्हा राजची ओळख प्रिया (नाव बदललेले) हिच्याशी झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ते दोघंही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. नेहा सासरी परतल्यावरही त्यांचे संबंध तसेच सुरू राहिले. या संबंधांतून त्यांना मूलही झालं.

अडीच वर्षं नात्यात राहिल्यानंतर राजने प्रियाला पत्नी म्हणून स्वीकारायला नकार दिला. दुसरीकडे नेहाला राजच्या प्रियासोबतच्या संबंधांबाबतही कळलं. तिनेही प्रियाशी संबंध तोडून टाकण्याचा लकडा राजकडे लावला. मात्र, त्याने त्याला नकार दिला. दोघांमध्ये वाद झाले.

अखेर नेहाने कौटुंबिक सल्ला केंद्रात धाव घेतली. तिथे वादावादी झाली. समुपदेशकाच्या समजवण्यानंतरही राजला नेहा किंवा प्रिया या दोघींपेकी कुणालाही सोडायचं नव्हतं. अखेर राजने दोघींनाही वेळ विभागून देत असल्याचा प्रस्ताव सादर केला. आठवड्याचे तीन दिवस पत्नी नेहा आणि तीन दिवस प्रेयसी प्रिया हिच्यासोबत घालवेन तर उर्वरित एक दिवस स्वतंत्र असेल, असं त्याने सांगितलं. याला दोघींचीही मंजुरी मिळाल्याने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.