एमयूटीपीसाठी राज्य सरकारने आणखी दीडशे कोटी दिले; एकूण तीनशे कोटी मिळाल्याने प्रकल्पांना गती मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई रेल्वे विकास महामंडळाला आता आणखी दीडशे कोटी रुपयांचा निधी मंगळवारी एमएमआरडीएच्या वतीने राज्य सरकारने दिला आहे. याआधीही दीडशे कोटींचा फंड ट्रान्सफर करण्यात आला होता. एकूण 300 कोटी रुपये आतापर्यंत मिळाले असल्याने मुंबईच्या पायाभूत प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळ हे राज्य आणि केंद्र सरकारच्या समसमान निधीतून मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात रेल्वेच्या पायाभूत प्रकल्पांसाठी काम करीत असते. रेल्वेच्या अर्थसंकल्पात यंदा एमयूटीपी-3च्या प्रकल्पांसाठी 750 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. परंतु राज्य सरकारचा वाटा न आल्याने रेल्वेनेही आपला निधी थांबविला होता. राज्य सरकारकडून गेल्याच पंधरवडय़ात 150 कोटींचा निधी एमएमआरडीएच्या वतीने देण्यात आला होता. आता आणखी 150 कोटींचा निधी मिळाल्याने टेंडर काढण्याची कामे सुरू होतील. मुंबई सेंट्रल ते बोरिवली आणि कुर्ला ते सीएसएमटी पाचवी व सहावी मार्गिका, 47 एसी लोकल, कळवा ते ऐरोली एलिव्हेटेड लिंक, पनवेल ते वसई नवा रेल्वे मार्ग, विरार ते डहाणू चौपदरीकरण प्रकल्पांना चालना मिळणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्रवक्ते सुनील उदासी यांनी सांगितले.