यात्रेसाठी जाणाऱ्या चुलतभावांवर काळाचा घाला, भरधाव स्विफ्टच्या धडकेत दोन ठार; तिघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव स्विफ्ट कारच्या धडकेत दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत दोन चुलतभावांचा मृत्यू झाला असून, दुचाकीवरील एक आणि कारमधील दोघे असे तीनजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर एका दुचाकीने पेट घेतला, तर कार 30 फूट लांब जाऊन एका शेतात उलटली. गोंदवले खुर्द येथील हॉटेल ‘मेजर’समोर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. पानवन गावचे ग्रामदैवत श्री मरीआई देवीची यात्रा शुक्रवारी आणि शनिवारी असून, या यात्रेसाठी गावातील लोक मोठय़ा संख्येने येत असतात. याच यात्रेसाठी जाताना हा अपघात झाला आहे.

अजित शंकर नरळे (वय 18), उमाजी अप्पा नरळे (वय 22, रा. पानवन, ता. माण) अशी मृतांची नावे असून, कारमधील महेंद्र ज्ञानू वाघमारे आणि त्यांचा मुलगा आशीष महेंद्र वाघमारे (रा. दिघंची, ता. आटपाडी), तर दुसऱया दुचाकीवरील नामदेव नागू वीरकर (वय 45, रा. जांभुळणी, ता. माण) जखमी झाले आहेत.

अजित आणि त्याचा चुलतभाऊ उमाजी हे आज सकाळी दुचाकीवरून पानवन यात्रेसाठी पुण्यावरून निघाले होते, तर कामधील महेंद्र वाघमारे हे मुलगा आशीषसह पुण्याला निघाले होते. गोंदवले खुर्द येथे मुख्य रस्त्यावरून जाताना हॉटेल ‘मेजर’समोर या कारने दोन दुचाकींना धडक दिली. या धडकेनंतर अजित आणि उमाजीची दुचाकी एका शेतात जाऊन पडली. त्यानंतर तिने पेट घेतला. यात उमाजीचा जागीच, तर अजितचा कराडला उपचारांसाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. दुसऱया दुचाकीवरील नामदेव वीरकर हे जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी सातारा येथे दाखल करण्यता आले आहे. तर, भरधाव कार एका शेतात जाऊन उलटली असून, त्यातील पिता-पुत्रही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस केतन बर्गे, गजानन वाघमारे व राऊत यांनी तत्काळ गर्दी हटवून रस्ता खुला केला. सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी पाहणी केली. दहिवडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर तपास करीत आहेत.

यात्रेला पोहोचण्याची इच्छा अपुरीच राहिली

अजित नरळे हा आई-वडिलांना एकुलता एक असून, उमाजीला एक भाऊ आणि चार बहिणी आहेत. दोघांच्याही घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून, आई-वडील ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. ऊसतोडणीचे काम संपवून ते नुकतेच घरी आले होते. अजित हा पुण्यात एका कंपनीत काम करतो, तर उमाजी हा गेल्या दीड वर्षापासून नेपाळमध्ये सोन्या-चांदीच्या दुकानात काम करीत होता. दीड वर्षानंतर तो यात्रेनिमित्त मोठय़ा आनंदाने गावी येणार होता. मात्र, उमाजीची यात्रेला पोहोचण्याची इच्छा अपुरीच राहिली. या दोघांच्या मृत्यूमुळे पानवन गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.