‘नीट’ परीक्षा पुढे ढकला! दहा हजारांवर विद्यार्थ्यांची ‘एनटीए’ला पत्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
MBBS Exam

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी दहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) पत्रे पाठवली आहेत. ‘नीट’ परीक्षेच्या तारखेदरम्यानच इतरही स्पर्धा परीक्षा होणार असल्याने अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांनी ही मागणी केली आहे.

‘सीयूईटी’ परीक्षा जुलैच्या पहिल्या आणि दुसऱया आठवडय़ात होणार आहे. जेईईचा दुसरा टप्पाही 21 जुलै रोजी होणार आहे. त्या परीक्षांच्या दरम्यान 17 जुलै रोजी ‘नीट’ परीक्षा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या तीनही परीक्षांच्या अभ्यासाचा प्रचंड ताण पडणार आहे, असे विद्यार्थ्यांनी या पत्रांमध्ये नमूद केले आहे.

गेल्या वर्षीच्या ‘नीट’ परीक्षेचे समुपदेशन राऊंड अद्याप बाकी असताना या वर्षीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. अनेक राज्यांमध्ये अजूनही हे समुपदेशन राऊंड पूर्ण झालेले नाहीत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ‘नीट 2021’ परीक्षेसाठी आरक्षणाचे धोरण बदलण्यात आले होते. त्या धोरणानुसार आपली टक्केवारी जमेल का याचे गणित विद्यार्थ्यांनी अजून केलेले नाही. असे असतानाच एनटीएने नव्या परीक्षेची तारीख जाहीर केली, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

गेल्या वर्षी ‘नीट’ परीक्षा 1 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती, परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ती 12 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. एमबीबीएस होणे हे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते आणि त्यांचे पालक आणि शिक्षकांच्या भावनांशीही ते निगडित असते. परीक्षांच्या तारखांमुळे त्यांचे ते स्वप्न मोडले जाईल. तसे होऊ नये म्हणून त्यांना पुरेसा वेळ देणे महत्त्वाचे आहे, असेही पत्रांमध्ये नमूद आहे.