
बेस्टच्या कुर्ला, विक्रोळी, वडाळा आणि वांद्रे आगारातील खासगी चालकांनी वेतन व देणी थकविल्याने सलग दुसऱया दिवशी बुधवारी काम बंद ठेवल्याने सुमारे 308 बसेस रस्त्यावर आल्या नाहीत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना त्याचा फटका बसला. बेस्टने आपल्या ताफ्यातील जादा बसेस चालवून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
बेस्टच्या खासगी कंत्राटदारांनी वेतन आणि पीएफ थकविल्याने हे काम बंद आंदोलन सुरू आहे. कुलाबा आगारातील कर्मचाऱयांनीही आंदोलनाची हाक दिली होती. परंतु कंत्राटदाराने 25 मेपर्यंत पगार व देणी देण्याचे मान्य केल्याने कुलाबा आगारातील कामगारांनी उद्याचे संप आंदोलन मागे घेतले असले तरी उर्वरित चार आगारातील कर्मचारी रात्री उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने आणि ते संपाच्या निर्णयावर ठाम असल्याने उद्याही गोंधळ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, बेस्टच्या ताफ्यात सुमारे 1,729 भाडेतत्वावरील खासगी बस असून बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या 1,873 बस आहेत.



























































