
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा गुुरुवारपासून धुमाकूळ सुरू असून सांगलीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर यवतमाळ आणि नांदेडमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. 12 तासांनंतर आजही पावसाची संततधार सुरू आहे. कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्गालाही आज दुसर्या दिवशी पावसाने झोपडले. दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या शनिवार, 21 मे रोजी पावसाच्या तुरळक सरी कोसळतील तर मराठवाड्याचा भाग कोरडा राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
देशात या वर्षी नियोजित वेळेपेक्षा तब्बल 6 दिवस आधी म्हणजे 16 मे रोजी मोसमी वारे सक्रिय होऊन अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला. पुढील 24 तासांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्रापर्यंत पोहोचतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरू असून यात सर्वात जास्त फटका पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला बसला आहे. सांगलीतील जत तालुक्यात सर्वात जास्त पाऊस कोसळला. गेल्या 12 तासांहून अधिक काळ सांगलीत मुसळधार पाऊस सुरू होता. सध्या जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. सांगली, मिरज, जतमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात 12 तासांनंतरही संततधार कायम असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांगलीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.
शेतीच्या कामाला वेग येणार
सांगली, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यालाही गुरुवारपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. यवतमाळच्या उमरखेड, महागाव तालुक्यात आज सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. नांदेडमध्येही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नांदेडसह हदगाव आणि अर्धापूर तालुक्यात मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीच्या कामाला वेग येणार आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटा कायम
राज्यातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला असला तरी विदर्भातील अमरावती आणि अकोल्यात 21 मेपर्यंत उष्णतेच्या लाटा कायम आहे. दरम्यान, पंढरपूर शहरात जोरदार दुपारी जोरदार वादळी वारे सुटले. यामुळे अनेक ठिकाणी धुळीचे लोट उडले. काही ठिकाणी झाडे तर काही ठिकाणी फांद्या मोडून पडल्या. पावसाच्या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
आसाममध्ये 7 लाखांहून जास्त लोकांना फटका
आसाममध्ये महापुराचे तांडव सुरूच आहे. पुराचा 27 जिल्ह्यांतील 7 लाख 52 हजार रहिवाशांना फटका बसला असून, आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू तर 1 जण बेपत्ता आहे. दरम्यान, 1 हजार 413 गावे अजूनही पाण्याखाली आहेत.
केरळमधील 9 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
दक्षिणेतील राज्यांमध्ये मान्सूनने दमदार हजेरी लावली असतानाच आता येत्या 24 तासांत केरळमधील 9 जिल्ह्लांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने केरळमधील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट देत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. केरळमधील तिरुअनंतपूरम, कोलम, पठानठित्ता, अलापुझा, इर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, मल्लापूरम आणि कोझिकोडे या जिल्ह्यांमध्ये 6 ते 11 सेंटीमीटर इतका मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, कर्नाटकमधील बंगळुरुमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले.























































