
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या सभेत शिवसेनेबाबत काही वक्तव्य केले. त्याचा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेना आणि आमच्या हिंदुत्वाबाबत कोणीही काही बोलण्याची गरज नाही. आमची भूमिका ठाम आहे, असेही त्यांनी नवहिंदुत्ववाद्यांना सुनावले आहे.
शिवसेनेबाबत त्यांनी बोलू नये, त्यांनी स्वतःबाबत आणि स्वतःच्या पक्षाबाबत बोलावे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची क्रेडिटिबिली काय आहे, हे राज्याला आणि देशाला माहित आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत काहीही बोलण्याची गरज नाही. बाळासाहेबांची शिवसेना 50 वर्षांपासून राज्यात काम करत आहे. त्यांच्या भाषेत सांगायचे तर आमची क्रेडिटिबिली आहे म्हणून शिवसेना 50 वर्षे टिकून आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे. ते झालेच आहे. बाळासाहेबांनी सांगितले, हे संभाजीनगर झाले, त्याचवेळी ते झाले आहे. आता फक्त कागदोपत्री व्हायचे आहे. तेही लवकरच होईल, असे ते म्हणाले. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे आहे, ते मंजूर करतील. त्यावेळी कागदोपत्री ते नाव होईल, असेही त्यांनी सांगितले.
हे हिंदुत्ववादी कधी झाले, आमच्या हिंदुत्वाला ढोंगी म्हणणाऱ्यांनी हिंदुत्वाची शाल कधी पांघरली, ते सांगावे. भगवी शाल अंगवार घेऊन हिंदुत्ववादी होता येत नाही. आमचे हिंदुत्व प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्व आहे. आमच्या हिंदुत्वावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. आमचे हिंदुत्व असेच तेजाने तळपत राहणार आहे. तुमची हिंदुत्वाची कालची आणि आजची भूमिका काय आहे, असा सवालही त्यांनी केला.
राज्यातील भाजप तुमच्या पाठिशी आहे. तिथेही भाजप तुमच्या पाठिशी आहे. मग तुम्हाला अयोध्येत जाण्यापासून कोणी रोखले आहे. तुम्ही नेते आहात, तुम्हाला विरोध होतोय, तर तो झुगारून जाऊन दाखवा. तुम्ही तर दौराच रद्द केला. राज्यातून विरोधाला सुरुवात झाली, हे त्यांचे वक्तव्य वैफल्यग्रस्त आहे. ही त्यांची निराशा आहे. त्यांच्यावर उपचाराची गरज आहे. या सर्वांना समुपदेशनाची गरज आहे. माणासाला निराशेने, वैफल्याने ग्रासल्याने अशी माणसे काहीही विधाने करतात. त्यांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. आता त्यांनी सोयीने हिंदुत्वाचा विषय घेतला आहे. त्यामुळे कोणीतीही भूमिका घेताना इतिहास तपासून बघावा, असा सल्लाही राऊत यांनी नवहिंदुत्ववाद्यांना दिला आहे.
या मातोश्रीने तुम्हाला आणि अनेकांना मोठे केले आहे. त्यामुळे मातोश्रीबाबतच्या श्रद्धा काय आहे, हे त्यांनी सांगण्याची गरज नाही. एमआयएम आणि नवहिंदुत्वावादी यांना कोण मोठे करतेय हे सगळ्यांना माहिती आहे, असेही ते म्हणाले. औरंगजेबाची कबर केंद्राच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येते. यावर काय करायचे ते अधिकार केंद्राकडे आहे. या तोडा ती कबर, तुम्हाला कोणी रोखले आहे, असा सवालही त्यांनी केला.

























































