
>> डॉ. अमित बागवे
एप्रिल 2022 मध्ये घाऊक महागाईचा दर गेल्या 17 वर्षांतील उच्चांकी ठरला आहे. एप्रिल 2022 मधील किरकोळ महागाईचा दर आठ वर्षांचा उच्चांक गाठणारा ठरला आहे. 7.79 टक्के इतका महागाईचा दर नोंदला गेला आहे. खाद्य महागाईचा दरही 8.38 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. संपूर्ण 2022 या वर्षात किरकोळ महागाईचा दर सहा टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खाद्य तेल, गॅस, डाळी, भाजीपाला आणि गहू – तांदळाचे भाव मोठय़ा प्रमाणात वाढत चालले आहेत. सर्वसामान्यांचे रोजचे जगणे दिवसेंदिवस खडतर होत चालले आहे. सरकारी कर्मचारी सोडले तर कोणाचेच उत्पन्न वाढण्याचे चिन्ह दिसत नाही. कोरोनामुळे भरडून निघालेला सर्वसामान्य माणूस महागाईच्या खोल दरीत लोटला जात आहे.
हिंदुस्थानात शहरी भागातील बेरोजगारीचा दर गेल्या वर्षातील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 8.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै-सप्टेंबर 2021 मध्ये 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील व्यक्तींसाठी बेरोजगारीचा दर शहरी भागात 9.8 टक्के होता. वाढत्या बेरोजगारीमुळे सामाजिक अशांततेचे प्रश्न निर्माण होत आहेत.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये गेल्या चाळीस वर्षांतील उच्चांकी महागाई पोहोचली आहे. त्यामुळे वाढलेल्या महागाईला लगाम घालण्यासाठी व्याजदर वाढीचे पाऊल उचलले जात आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले आहेत. तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनेसुद्धा व्याजदर वाढविण्यास सुरुवात केली आहे. जगातील इतर देशांतसुद्धा व्याजदर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. व्याजदर वाढविल्यामुळे व्यवहारातील रोकड कमी होईल. जागतिक पातळीवरसुद्धा कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता अगदीच धूसर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. हिंदुस्थानात तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई भडकत राहणार आहे. इंडोनेशियामध्ये पामतेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि वाढत्या महागाईमुळे देशांतर्गत खाद्य तेलाच्या किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. प्रतिडॉलर पहिल्यांदाच रुपया 77.50 पातळीच्या खाली घसरला आहे. शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण सुरू आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार यामुळे पोळला जातो आहे. नोकरीचे आणि व्यवसायातले उत्पन्न वाढत नाही आणि गुंतवणुकीवरचा परतावा कमी होत आहे किंवा मिळत नाही. क्रिप्टो करन्सीच्या व झटपट श्रीमंतीच्या विविध फसव्या योजना सामान्यांचे आर्थिक नुकसान करतच आहेत.
हा महागाईचा भस्मासुर दिवसेंदिवस मोठा होत आहे. आता आपल्याला आपले मासिक उत्पन्न कसे वाढेल याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. इतर समाजाच्या मानाने मराठी समाजात आर्थिक संपन्नता फारच कमी आहे. त्यामुळे मराठी समाजाने आपल्या आर्थिक उन्नतीकडे लक्ष देऊन त्यासाठी एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने कार्य करायला हवे.
(लेखक अर्थविषयक अभ्यासक आहेत.)
























































