
पोटचा गोळा हरवल्याचे दु:ख आई-वडिलांशिवाय कोणाला कळणार नाही. अपत्य सापडले तर ठिक अन्यथा आयुष्यभर ही वेदना घेऊनच जगावे लागते. याच वेदनेतून एका 52 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्यांचा सात वर्षीय मुलगा 17 वर्षांपूर्वी हरवला होता. पोलीस, क्राईम ब्रान्च आणि सीबीआयने शोध घेऊनही मुलाचा शोध न लागल्याने हताश झालेल्या वडिलांनी अखेर मृत्यूला कवटाळले.
केरळच्या अलपुझा येथे आपल्या कुटुंबासोबत राहणारा राहुल राजू नावाचा 7 वर्षांचा मुलगा 17 वर्षांपूर्वी 2005 मध्ये गायब झाला होता. क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला राहुल पुन्हा घरी परतलाच नाही. कुटुंबियांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो कुठेही आढळून आला नाही. अखेर हे प्रकरण पोलिसांमध्ये गेले. राहुल बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली. पोलिसांनीही त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. यानंतर क्राईम ब्रान्च आणि सीबीआयच्या पथकानेही राहुल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही यश आले नाही. पोटच्या मुलाचा शोध लागत नसल्याचे पाहून राहुलचे वडील ए.आर. राजू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, ए. आर. राजू यांचे वय 52 होते. ते पत्नी आणि मुलीसोबत अलपुझा येथे रहात होते. गेल्या काही काळापासून ए.आर राजू हे नोकरीच्या शोधामध्ये होते अशी माहिती त्यांचे शेजारी एम.एस. मुजीब यांनी दिली. त्यांची पत्नी मिनी हे एका कंपनीमध्ये पार्ट टाईम नोकरी करत होती आणि तिच्या पैशातूनच घरखर्च भागवला जात होता. मात्र रविवारी पत्नी आणि मुलगी बाहेर गेलेली असताना ए.आर. राजू यांनी गळफास घेतला.
ए.आर. राजू यांचा मुलगा राहुल 18 मे 2005 ला घराबाहेर क्रिकेट खेळताना अचानक बेपत्ता झाला होता. त्यावेळी ए.आर. राजू हे कुवैतमध्ये एका खासगी कंपनीमध्ये काम करत होते. मुलगा गायब झाल्याचे कळताच त्यांनी नोकरी सोडली आणि मायदेशी आले. तेव्हापासून राहुलचा शोध सुरू होता. आधी पोलीस, नंतर क्राईम ब्रान्च आणि सीबीआयही राहुलचा शोध घेऊन थकली. अखेर 2009 मध्ये सीबीआयने केस बंद करण्याची परवानगी मागितली, मात्र कोर्टाने वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले.
सीबीआयने चौकशीदरम्यान राजू यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन डझनहून अधिक लोकांची चौकशी केली. राजू जॉर्ज या शेजाऱ्याची पॉलिग्राम टेस्टही करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी आढळलेल्या बेवारस मृतदेहांमध्येही राहुल याचा शोध घेण्यात आला. याच दरम्यान एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा आरोपी कृष्णा पिल्लई याने आपणच राहुलची हत्या केल्याचे कबुल करत खळबळ उडवून दिली. राहुलचा मृतदेह अलपुझातील तलावात टाकल्याचे आरोपीने म्हटले. पोलिसांनी शोध घेतल्यानंतरही राहुलच्या मृतदेहाचा किंवा सापळ्याचाही पत्ता लागला नाही. अखेर 2014 मध्ये सीबीआयने कोचीच्या सीजेएम कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि कोर्टानेही त्यास मान्यता दिली.

























































