
मुंबईतील विकासकामे पर्यावरणपूरक पद्धतीने करणाऱया पालिकेने आता आरे कॉलनीतील रस्ते तयार करताना प्राण्यांना रस्त्याचा अडथळा ठरू नये यासाठी रस्त्याखालून भुयारी मार्ग तयार केला आहे. दिनकरराव देसाई मार्गासह परिसरात केलेल्या रस्त्यांच्या कामात एकही झाडाला धक्का न लावता रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी मंगळवारी या पावसाळीपूर्व कामांची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे अंतिम टप्प्यात असून समाधानकारकरीत्या काम सुरू असल्याचे यावेळी पी. वेलरासू यांनी सांगितले. अंधेरी तेली गल्ली येथील उड्डाणपुलाचे कामही सध्या प्रगतिपथावर आहे. 570 मीटर लांब व 17 मीटर रुंदीचा हा पूल आहे. गोरेगाव शास्त्र्ााrनगर नाल्यालगत संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी रस्त्याचे कामही केले जाणार आहे.
कांदिवली पश्चिम येथील पोयसर नदीलगत लवकरच संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून या ठिकाणची बांधकामे हटवण्यात आली आहेत. बोरिवली पश्चिम कल्पना चावला चौक ते स्वामी विवेकानंद मार्ग यादरम्यान आर. एम. भट्टड मार्गावरून जाणाऱया 937 मीटर लांब आणि 15.3 मीटर लांबीच्या पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
नालेसफाई अंतिम टप्प्यात, 91 टक्के काम पूर्ण
मुंबईत एकूण कामापैकी 91.13 टक्के काम पूर्ण झाले आहे. 31 मेपर्यंत शहर, पूर्व-पश्चिम उपनगर आणि मिठी नदीसह मोठय़ा आणि छोटय़ा नाल्यांमधून 907748.3 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
यातील 91.13 टक्के गाळ 24 मेपर्यंत काढण्यात आला. शहर भागात 91.14 टक्के, पूर्व उपनगर 87.24, पश्चिम उपनगर 83.74 आणि छोटय़ा नाल्याची 97.07 टक्के सफाई झाली. मिठीमधून 93.59 टक्के गाळ काढला गेला.
मिलन सब वे पूरमुक्तीसाठी दोन कोटी लिटरची टाकी
अतिवृष्टीच्या वेळी अंधेरी परिसरातील मिलन सब वे परिसरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या ठिकाणी तुंबणारे पाणी साठवण्यासाठी सब वेलगतच्या भूखंडावर तब्बल दोन कोटी लिटर क्षमतेचे ‘साठवण जलाशय’ बांधला जाणार आहे. या जलाशयाचे काम प्रगतिपथावर असून येत्या पावसाळय़ात याचा उपयोग होईल, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

























































