
बॉलीवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता आमीर खान आता पुढच्या आयपीएल स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी माजी विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग बनलेला दिसणार आहे. आमीर खानच्या क्रिकेटवरील ‘लगान’ या चित्रपटाचा हवाला देत राजस्थान संघाच्या व्यवस्थापनाने ‘आमीर हमारे टीममे खेलेंगा,’ असे घोषवाक्य आमीरच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केले आहे.
माजी आयपीएल विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाच्या निमंत्रणाबाबत आमीर खान यानेही आनंद व्यक्त केला आहे. राजस्थान संघाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित उपक्रमांत सहभागी व्हायला मला निश्चितच आवडेल. पुढच्या आयपीएलमध्ये मी राजस्थान रॉयल्सच्या डग आऊटमध्ये हजार राहून नक्कीच संघाला चीअर अप करताना आणि खेळाडूंचे मनोधैर्य वाढवताना दिसणार आहे, असे आमीर म्हणाला.
तुमच्या संघात मला दाखवून माझा सन्मानच केलाय
धन्यवाद, माझ्यासारख्या सामान्य क्रिकेटप्रेमी व्यक्तीला तुमच्या बलाढय़ संघाच्या छायाचित्रात स्थान दिल्याबद्दल मी आभारी आहे. पुढच्या हंगामात मी तुमच्या सरावासाठी नेटमध्ये नक्कीच हजार असेन. आपण सर्व मिळून हल्लाबोल करू. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच, अशा शब्दांत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खानने राजस्थान रॉयल्स संघव्यवस्थापनाचे आभार मानले.

























































