मिशन ऍडमिशन जोमात, एका महिन्यात पालिकेचे 35 हजार विद्यार्थी वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दर्जेदार सुविधा आणि अत्याधुनिक शिक्षण देणाऱया मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत असून केवळ 15 दिवसांत तब्बल 35 हजार विद्यार्थी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. पालिकेच्या ‘मिशन ऍडमिशन ः एकच लक्ष्य – एक लक्ष’ मोहिमेत ही विद्यार्थी संख्या वाढली आहे. यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या आता 3 लाख 33 हजारांवर पोहोचली असल्याचे शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिका शाळांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याने विद्यार्थी-पालकांचा ओढा पालिका शाळांकडे वाढला आहे. पालिका शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम, मोफत टॅब, मोफत ‘बेस्ट’ बस प्रवास आदी सुविधा दिल्या जातात. जागतिक स्पर्धेत पालिकेचे विद्यार्थी टिकावेत यासाठी केंब्रिज बोर्ड, आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत पालिका आठ भाषा माध्यमांच्या शाळांतून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. गेल्या दोन वर्षांत दहावीचा निकाल 54 टक्क्यांवरून 91 टक्क्यांवर गेला आहे. कोरोना काळातही दोन वर्षांत पालिका शाळांमध्ये सुमारे 30 हजार विद्यार्थी वाढले आहेत.

असे वाढले विद्यार्थी

इंग्रजी माध्यम – 14000

मराठी माध्यम – 8000

हिंदी माध्यम – 6900

उर्दू माध्यम – 6000

शैक्षणिक स्थिती

पालिकेच्या एकूण शाळा –  3420

शाळांच्या एकूण इमारती –  450

एकूण विद्यार्थी संख्या – 333000

एक लक्ष विद्यार्थी वाढवण्याचे लक्ष्य

– पालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी 18 एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. याआधी 14 एप्रिलपासून सुरू केलेल्या ‘एकच लक्ष्य ः एक लक्ष’ मोहिमेत शिक्षक, कर्मचारी, प्रशासन यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. यामुळे केवळ 30 एप्रिलपर्यंत 35 हजार विद्यार्थी वाढले.

– या मोहिमेत ‘एक लक्ष’ विद्यार्थी वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी जूनपासून ही मोहीम पुन्हा राबवण्यात येणार आहे. पालिका शाळांमध्ये मिळणारे मोफत शिक्षण, सुविधा, कला-क्रीडा आणि अंगिभूत गुणांना मिळणारी संधी याबाबत माहिती दिली जाणार आहे.