महाराष्ट्रातील भाजपचे नेते सत्तापिपासू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

‘महाराष्ट्रातील भाजपचे नेते सत्तापिपासू झाले आहेत. त्यामुळे ते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि सभ्यतेला शोभत नाही,’ असा टोला मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लगावला.

‘शिवसंपर्क अभियाना’अंतर्गत सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार बारणे बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महिला आघाडीच्या सीमा पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, ‘शिवसेना पक्ष संघटनात्मक बांधणी, तसेच शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार चांगले काम करीत आहे. सरकारची विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविणे, हाच या शिवसंपर्क अभियानाचा मुख्य उद्देश आहे.’

‘राज्यातील भाजप सत्तापिपासू झाली आहे. हे लोक अत्यंत हीन दर्जाची टीका खालच्या पातळीवर जाऊन करतात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. केंद्रातील भाजप सरकार महागाईवर काही बोलत नाही. देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. महापालिका निवडणुकीत आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक पक्षाला संघटना वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जो तो प्रयत्न करीत असतो,’ असेही ते म्हणाले.