
>>ऋता कळमणकर
जलस्थलवासी म्हणजे पाणी आणि जमीन दोन्हीवर राहू शकणारा उभयचर. बेडूक हा प्राणी आणि पाऊस यांचा एक अतूट संबंध आपल्या मनात नेहमीच असतो. उभयचर वर्गातील प्राणी म्हणजे बेडूक. याचे पिल्ले किंवा अंडय़ातून नुकतेच बाहेर आलेले सदस्य पाण्यात व प्रौढ जमिनीवर राहतात. या प्राण्याची उक्रांती अंदाजे सुमारे 35 कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. त्याचे तीन गण असून त्यातील एका गणात बेडूक येतात. या प्राण्याची कातडी नेहमी ओलसर असून त्याला सूर्याची उष्णता फार काळ सहन होऊ शकत नाही. त्याचा श्वासोच्छ्वास जसा फुप्फुसांनी केला जातो तसाच कातडीद्वारे पण केला जातो.
हा थंड रक्ताचा प्राणी आहे. सभोवतालच्या तापमानाप्रमाणे त्याच्या शरीराचे तापमान बदलत असतो. बेडूक नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून अति थंड तापमानात तो स्वतःला जमिनीत गाडून घेऊन निद्रा घेतो. यादरम्यान तो त्याचे कातडीद्वारे श्वासोच्छ्वास करत असतो व जगण्यासाठी साठवलेली ऊर्जा वापरतो. निद्रा घेणारे बेडूक पावसाळय़ाच्या सुरुवातीला प्रजननासाठी बाहेर येतात व नराचा असणारा घोगरा आवाज आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. खाण्यासाठी याची प्रचंड प्रमाणात निर्यात होते व त्यामुळेच त्याची हत्या होते. त्याचप्रमाणे पाण्यात कीटकनाशके टाकली तर त्यामुळेही बेडूक मरतात. मादागास्कर येथील अँटॅसिबेच्या वर्षावनात खूप बेडकांच्या प्रजाती पाहण्याचा योग आला. मार्बल्ड रेन फ्रॉग हा हिरव्यागार आणि काळसर रंगाचा जाड व गुबगुबीत बेडूक रात्री ऍक्टिव्ह असून झाडाच्या ढोलीतील ओलसर जागी दिसतो. त्याचप्रमाणे ऑरेंज बॅक्ड मँटेला व ग्रीन मॅंटेला ही दिवसा व रात्री कार्यरत असणारी प्रजाती पाहिली. पांढरा व अंगावर ठिपके असणारेही अनोखे बेडूक मादागास्करमध्ये दिसतात. त्याचप्रमाणे बोफिस हाही अतिशय सुंदर, मोठे डोळे व निळा गळा आणि पिवळेधमक पारदर्शक शरीर असणारा बेडूक पाहण्यात आला.
मादागास्करप्रमाणेच कोस्टारिकाच्या रेनफॉरेस्टमध्येही खूप दुर्मिळ प्रजातीची बेडके आढळतात. विविधरंगी बेडकांची फोटोग्राफी म्हणजे फोटोग्राफरसाठी पर्वणीच आहे. हिरव्या रंगाचा आणि तांबडय़ा डोळय़ांचा रेड आय ट्री फ्रॉग आकाराने अगदीच दोन इंचांपर्यंत असतो. तसेच गडद हिरव्या अंगावर काळे ठिपकेवाला पॉयझन डार्ट फ्रॉग आणि तांबडय़ा शरीराचा निळय़ा पायांचा StraQerry डार्ट फ्रॉग, अशा अनेक प्रकारचे बेडूक येथे सहज पाहायला मिळतात.
रेड आय ट्री फ्रॉग हा सेंट्रल अमेरिकेत मेक्सिको, कोलंबिया, कोस्टारिका येथे आढळणारा, जास्तीत जास्त वेळ झाडांवरच राहणारा आणि लांबच लांब उडी मारण्यात पटाईत असा बेडूक आहे. त्यांना शिकार होण्याची भीती वाटली की, ते त्यांचे तांबडे डोळे मोठे करून लांब जीभ बाहेर काढतात. त्यामुळे समोरचा शिकारी रंगाच्या अचानक डिस्प्लेमुळे मागे सरतो व त्यांचे रक्षण होते.
ब्लॅक ग्रीन डार्ट पॉयझन फ्रॉग व स्ट्राबेरी पॉयझन फ्रॉग हे अतिशय सुंदर, पण विषारी बेडूक आहेत. या प्रजातीत मादी 3 ते 5 अंडी घालते. नर आणि मादी मिळून अंडय़ांची काळजी घेतात. छोटे कीटक, नाकतोडे, फ्लाईज हे त्यांचे मुख्य अन्न आहे.ॉ
रेन फॉरेस्टमध्ये पाणी, दलदलीच्या जागांना हे राहण्यासाठी प्राधान्य देतात. रेड आय ट्री फ्रॉग हा दिवसा झाडावर जास्तीत जास्त वेळ डोळे मिटून झोपूनच राहतो.
पावसाळय़ात महाराष्ट्राच्या अंबोली घाटातील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. धुक्याने वेढलेला हा रम्य परिसर निसर्गातील एक-एक खजिना असा काही उलगडून दाखवतो की, पर्यटक व फोटोग्राफर थक्क होऊन जातात. येथे मिळणाऱया दुर्मिळ बेडकाच्या जाती अंबोली बुश फ्रॉग, मलबार ग्लायडिंग फ्रॉग वन्य प्रेमींसाठी पर्वणीच असते.





























































