साय-फाय – मायक्रोप्लॅस्टिकचा विळखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

जगभरातील वाढत्या प्रदूषणाला जबाबदार असणारे जे घटक आहेत; त्यात प्लॅस्टिकचे स्थान बरेच वर आहे. आपल्या आजूबाजूची अशी एक जागा आता उरलेली नाही, जिथे प्लॅस्टिक पोहोचलेले नाही. चिंतेची गोष्ट म्हणजे हे उपद्व्यापी प्लॅस्टिक आता संशोधकांना मानवी रक्तातदेखील सापडले आहे आणि त्यामुळे जगभरातील संशोधकांमध्ये एक चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. मानवी रक्तात सापडलेल्या या घातक मायक्रोप्लॅस्टिक कणांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो हे अजून पूर्णपणे समोर आलेले नाही. मात्र त्यावर संशोधन सुरू आहे. ऍमस्टरडॅम येथील ‘व्हर्ज युनिव्हर्सिटी’ आणि ‘ऍमस्टरडॅम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर’च्या संशोधकांनी एकूण 22 लोकांच्या रक्ताची तपासणी केली. हे सर्व लोक रक्तदान करण्यात अग्रेसर असणारे लोक आहेत. जेव्हा त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला; तेव्हा त्यामध्ये पॉलिप्रॉपिलिन, पॉलिस्टिरिन, पॉलिमिथाईल मेथाक्रायलेट, पॉलिथिलिन आणि पॉलिथिलिन टेरेफ्थालेट या प्लॅस्टिक कणांची तपासणी करण्यात आली. या अभ्यासात असे आढळून आले की, 22 पैकी 17 लोकांच्या रक्तात लक्षणीय प्रमाणात प्लॅस्टिक होते. म्हणजेच एकूण 80 टक्के लोकांच्या रक्तात मायक्रोप्लॅस्टिक आढळले आहे. ‘एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनल जर्नल’मध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

या चाचणीत ‘पीईटी’चे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले. त्यानंतर दुसऱया क्रमांकावर पॉलिस्टिरिन, तिसऱया क्रमांकावर पॉलिथिलिन सापडले. प्लॅस्टिक पिशव्या तयार करण्यासाठी पॉलिथिलिनचा वापर केला जातो. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, मायक्रोप्लॅस्टिक कुठेही, अगदी मानवी शरीरातही प्रवेश करू शकते. प्रयोगशाळेत असेदेखील आढळून आले की, मायक्रोप्लॅस्टिक्समुळे मानवी पेशींचे नुकसान होते. जगभरात लोक आधीच अन्न आणि पाण्याद्वारे मायक्रोप्लॅस्टिकचे लहान कण सेवन करत आहेत.

मायक्रोप्लॅस्टिक हे आपल्या आजूबाजूला सर्वत्र पसरलेले आहे, तरीही अनेकांना त्याची किंवा त्याच्यापासून निर्माण होणाऱया धोक्याची माहिती नाही. मायक्रोप्लॅस्टिक हे मानवापासून ते सागरी जीवनापर्यंत सर्वच गोष्टींसाठी विनाशकारी ठरू शकतात. आज जगभरातील परिसंस्थांवर त्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत. ‘नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन’ (NOA) नुसार, मायक्रोप्लॅस्टिक हे 0.2 इंच (5 मिलिमीटर) पेक्षा लहान प्लॅस्टिकचे कण आहेत. त्यांचा आकार तिळाएवढा मोठा असू शकतो.

मायक्रोप्लॅस्टिक्सचे हे छोटे कण जिवाणू आणि पर्सिस्टंट ऑर्गेनिक प्रदूषकांचे (पीओपी) वाहक म्हणून काम करतात. पीओपी ही विषारी सेंद्रिय संयुगे आहेत, जसे की, प्लॅस्टिकसारखे आणि त्याचे विघटन होण्यास वर्षे लागतात. यामध्ये कीटकनाशके आणि डायऑक्सिन्ससारख्या रसायनांचा समावेश आहे, जे मानव आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजीमध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, लोक दरवर्षी 39 हजार ते 52 हजार मायक्रोप्लॅस्टिक कण शरीरात घेतात. दुसरीकडे मात्र ‘मायक्रोप्लॅस्टिकचा मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे’ जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सुचवले आहे.

z [email protected]