
>> प्रा. डॉ. रामकिशन दहिफळे
ज्या स्त्रिया स्वतःच्या स्वतंत्र कर्तृत्वाचा ठसा उमटवितात त्यांची नोंद इतिहासात होते. अहिल्यादेवी होळकर या अशा स्त्रियांपैकीच एक होत. त्यांनी आपल्या मंगलमय व्यक्तिमत्वाने व उत्तुंग अशा लोककल्याणकारी कार्याने स्वतःची स्वतंत्र अशी ओळख हिंदुस्थानच्या इतिहासात निर्माण केली आहे. गरीब, दीनदुबळे, प्राणिमात्रांची सेवा म्हणजे पुण्यदायी काम ही भूमिका घेऊन त्यांनी जीवनभर काम केले. राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार, उपेक्षित, वंचित घटक त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता.
नगर जिह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेडेगावी 31 मे 1725 रोजी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला. माणकोजी शिंदे यांच्या या कन्येतील धाडस, चांगूलपणा, चाणाक्षपणा दूरदृष्टीच्या मल्हारराव होळकरांनी हेरला आणि त्या सुभेदार खंडेराव होळकर यांच्या पत्नी व मल्हारराव होळकर यांच्या सून म्हणून माळव्याला आल्या. वैवाहिक जीवनातील सुखाबरोबरच दुःखाचे आघातही त्यांच्या वाटय़ाला आले.
पती खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर सासरे मल्हाररावांनी प्रतिकूल परिस्थितीत राज्यकारभाराची दिलेली जबाबदारी त्यांनी स्कीकारली. सर्व आघात सोसूनही आपले लोककल्याणकारी कार्य त्यांनी जोमाने सुरू केले. तत्कालीन परिस्थितीत आपले मानसिक क नैतिक बळ वाढविण्यासाठी त्यांनी अध्यात्म जवळ केले. मात्र, अंधश्रद्धेला त्यांनी थारा दिला नाही. गरीब, दीनदुबळे, प्राणिमात्रांची सेवा म्हणजे पुण्यदायी काम ही भूमिका घेऊन त्यांनी जीवनभर काम केले. दीर्घकालीन कल्याणाचा विचार त्यांनी कृतीतून करून दाखविला. आजही गावागावांत आढळणाऱ्या, तहान भागविणाऱ्या विहिरी, तलाव, कुंड, रस्ते, पूल, धर्मशाळा, घाट, वृक्ष लागवड, मंदिर आदींचा त्यांनी जीर्णोद्धार केला. पशुपक्ष्यांसाठी कुरणे सुरक्षित ठेवून निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न केले. अशा विविध लोककल्याणकारी कार्यातून या लोकमातेची दूरदृष्टी दिसून येते.
अहिल्यादेवींकडे सत्ता आली तेव्हा सोळा कोटींचे द्रव्य आणि पंधरा लाखांची मिळकत होती. एकढय़ा अमाप संपत्तीवर अहिल्यादेवींची एकहाती सत्ता होती. या सत्तेचा उपयोग त्यांनी लोककल्याणकारी कामासाठी केला. व्यक्तिगत जीवनात अनेक संकटांना तोंड देत माळवा प्रांताचा सुमारे 28 वर्षे त्यांनी राज्यकारभार केला, पण या सगळ्या कारभारात त्यांनी स्वतःची अशी अर्थनीती आणि जलनीती ठरविली. लोककल्याणकारी राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण अहिल्यादेवींनी घालून दिले. राजकारण व समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजून त्यांनी त्यापुढे जाऊन नेतृत्व केले. त्यांच्या काळात अर्थव्यवस्थेचे दोन भाग होते. एक खासगी व दुसरा सरकारी. खासगी व्यवहार त्या स्वतः पाहत असत आणि सरकारी व्यवहार पाहण्यासाठी त्यांनी दरबारात तज्ञ मंडळींची एक समिती तयार केली होती. त्यांच्या साह्याने व सल्ल्याने त्या आर्थिक व्यवहार पाहत असत.
सरकारी पैसा त्यांनी योग्य कामासाठी, लोकांच्या कल्याणासाठी खर्च केला. एकढय़ावरच न थांबता त्यांनी त्यांच्या दरबारात काही अधिकारी मंडळींना पैशाचा योग्य विनियोग करण्यासाठी खास प्रशिक्षणही दिले. त्यांची अर्थनीती अतिशय पारदर्शी होती. राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार, उपेक्षित, वंचित घटक त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळेच आदिवासी भिल्ल, भूमिहीन शेतमजूर यांना त्यांनी माळरान, पडीक जमिनी कसावयास देऊन त्यांना जगण्याचे साधन निर्माण करून दिले. राज्यकारभार करताना त्यांनी जुन्या रूढी-परंपरा यांना कायमच विरोध केला होता. सती जाणे, हुंडा घेणे, केशवपन या जुन्या वाईट चालीरीती मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी जमीन कसताना त्या जमिनीत 20 फळझाडे लावावीत, त्यातील अकरा फळझाडे सरकारची व नऊ झाडे शेतकऱ्यांची असे सूत्र ठरवले. उत्पन्नवाढीसाठी वेगवेगळ्या तंत्रांचा कापर केला. ग्रामविकास करताना चुकीचे काम करणाऱ्याला त्या खडसावत असत. गाव आणि त्यांची सुरक्षा याला त्या महत्व देत. त्यासाठी त्यांनी चौकीदाराची व्यवस्था केली होती. गावोगावी न्याय देणारे अधिकारी नेमले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवडीची योजना राबविली. सैन्य व्यवस्था चोख ठेवली, शिवाय स्वतंत्रपणे महिलांची फौजही निर्माण केली. एवढेच नव्हे, तर राज्यात स्वतंत्र अशी पोलीस यंत्रणाही होती. न्यायदान तर त्या अशा पद्धतीने करत की, दोन्ही बाजू त्यांना दुवा देत असत. धर्मनिरपेक्षता त्यांच्या अंगी ठायी ठायी होती. त्यांनी अनेक मुस्लिम पीर दर्ग्यांना देणगी दिली.
शिक्षणविषयक दूरदृष्टीही त्यांच्या ठायी होती. त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी गुरुकुल उभारले. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेक ग्रंथ होते. स्त्रियांचा सन्मान, कवी, कलावंतांच्या कलेला वाव त्या देत. कलावंतांना त्यांनी अनेक बक्षिसे दिल्याची उदाहरणे इतिहासात आहेत.
इंग्रज हे देशाचे शत्रू आहेत हे अहिल्यादेवींनी ओळखले होते. ब्रिटिशांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी पेशव्यांच्या वकिलांना त्यांनी काही महत्वाच्या सूचनाही दिल्या होत्या. विठ्ठल श्यामराज हा नानासाहेब पेशव्यांचा वकील अहिल्यादेवींकडे आपली हुशारी दाखविण्यासाठी आला, तेव्हा अहिल्यादेवी म्हणाल्या, इंग्रजांनी वसई घेतली म्हणजे देशात उपद्रव करतील. मग पुणे कसे राहील? हे भूगोलाचे व ब्रिटिश राजनीतीचे अहिल्यादेवींना असलेले ज्ञान पाहून तोही आश्चर्यचकित झाला.
आपली एकुलती एक कन्या मुक्ताबाई हिचा विवाह त्यांनी ‘पण’ लावून केला. त्यांनी दरबार भरवून आवाहन केले की, जो कोणी तरुण आपल्या राज्यातील चोर, दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल, त्या तरुणासोबत माझी कन्या मुक्ताबाई हिचा विवाह लावून देण्यात येईल. यशवंतराव फणसे या कर्तबगार तरुणाने हा विडा उचलला व अहिल्यादेवींनी त्याच्या सोबत काही फौजफाटा देऊन चोर, दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. पुढे मोठय़ा थाटामाटात अहिल्यादेवींनी आपल्या मुलीचा विवाह यशवंतराव फणसेसोबत लावून दिला. यावेळी तो तरुण कोणत्या जातीचा आहे हे न पाहता केवळ त्याची कर्तबगारी अहिल्यादेवींनी पाहिली.
पुरुषप्रधान व्यवस्थेत व मध्ययुगीन अंदाधुंदीच्या काळात स्वच्छ आणि शिस्तबद्ध कारभार करणाऱ्या त्या रणरागिणी होत. मराठा कालखंडात जिजाबाई, अहिल्यादेवी, येसूबाई, ताराबाई अशा कर्तबगार स्त्रियांची मालिकाच दिसून येते. त्या इतिहासात एक लोककल्याणकारी व कर्तबगार स्त्री म्हणून अहिल्यादेवी होळकर सर्वांना परिचित आहेत.
मार्ग धारे वर्तावे।
विश्व हे मोहरे लावावे।
अलौकिक नो हाके लोकांप्रति।।
लोकांप्रति लोककल्याणकारी कामे करून, धार्मिक कामे करून त्यांनी दातृत्व कृत्ती जोपासली. संतत्व वृत्तीच्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 13 ऑगस्ट 1795 रोजी जगाचा निरोप घेतला.






















































