
कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि गारांच्या वर्षावात मान्सूनपूर्व पावसाने कोल्हापूरला झोडपले. सुमारे तासभर पावसाच्या तुफान फटकेबाजीने सर्वांची दैना उडाली. रस्त्यावरील पाणी दुकानात आणि घरात शिरले. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून वाहनांवर पडल्याच्या घटना घडल्या. तर जिल्हा परिषदेसमोर विद्युत खांबच भुईसपाट झाला. बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
आज सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात गारांच्या वर्षावात जोरदार पाऊस कोसळू लागला. त्यामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते. अनेक मैदाने, रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. हवेत गारवा निर्माण झाल्याने दिवसभरच्या उकाडय़ापासून काही काळ सर्वांची सुटका झाली. पावसामुळे बहुतांश ठिकाणी उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. जिह्याबाहेरून आलेल्या पर्यटकांसह फेरीवाल्यांची तारांबळ उडाली होती.
राजारामपुरी परिसरात भलामोठा वृक्ष कोसळून चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. तर रेल्वे ब्रिजखालील पारिख पूलही पहिल्या पावसात पाण्यामुळे बंद झाल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली. पहिल्याच पावसात अशी अवस्था तर पुढे काय होणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
रस्त्यांची उंची वाढल्याने घरात शिरले पाणी
शहरात बहुतांश रस्ते हे रस्त्यावरच तयार केले आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा रस्त्यांची उंची वाढली असून, घरे व दुकाने खाली गेल्याने पावसाचे पाणी थेट घरांत आणि दुकानात घुसत असल्याचे चित्र आहे. जन आंदोलनानंतर नव्याने तयार करण्यात आलेल्या गंगावेश ते रेगे तिकिटी परिसरात पहिल्याच जोरदार पावसाचे पाणी आज रस्त्याकडेच्या दुतर्फा घरांत आणि दुकानात शिरल्याने नागरिक हैराण झाले होते.
सांगलीत वादळी वाऱयासह हजेरी
सांगली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळीवाऱयासह पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. सांगली जिल्ह्यात बुधवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आज दुपारनंतर जिह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शिराळा, जत, विटा तालुक्यात दमदार पाऊस झाला.
अकोल्यात दमदार हजेरी
अकोले तालुक्यातील विविध भागांत बुधवारी रात्री वादळ वाऱयासह विजांच्या लखलखाटात आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. पहिल्याच पावसाने अकोले शहरातील अगस्ती विद्यालयासमोरील तळमजल्यातील गाळ्यांत पाणी घुसले. जवळपास तासभर मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू होती. या पावसाने रस्त्याकडेला मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत होते. झाडे पडल्यामुळे अकोले व राजूर शहर तसेच परिसरातील अनेक गावांत वीज गायब झाली होती. अकोले शहरातील अगस्ती विद्यालयाच्या समोरील तुळशीराम संकुलात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे पावसाचे पाणी अनेक गाळ्यांमध्ये घुसले.
श्रीरामपुरात वादळी वारे; झाडे पडली
श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील वडाळा महादेव, हरेगाव, गोंधवणी भागात वादळी वाऱयामुळे रस्त्यांवर झाडे पडली आहेत. काहींच्या घरांचे पत्रे उडाले, तर काही ठिकाणी विजेच्या तारा खाली लोंबकळत असलेल्या दिसत आहेत. त्यात काही ठिकाणी दुपारपासून वीज गायब झाली होती. गोंधवणी येथील नगरपरिषद कॉलनी येथे झाडे या वादळामुळे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. तसेच शहरात व तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. शिरसगाव ब्राम्हणगाव परिसरात अचानक आलेल्या वादळ व पावसाने ब्राम्हणगाव रस्त्यावर तसेच शिरसगाव ते गोंधवणी रस्त्यावर अनेक मोठी झाडे पडली आहेत.
काजव्यांचा लखलखाट वाढणार
भंडारदरा धरण परिसर व पाणलोटातही बुधवारी रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे दोन-चार दिवसांत काजव्यांचा लखलखाट वाढणार असून, काजव्यांचे मनोहारी दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
























































