
लष्कर तोयबा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या मोहम्मद जुनैद मोहम्मंद आणि कश्मीरमधून अटक केलेला साथीदार आफताब हुसैन शाह (वय 28, रा. किश्तवार, जम्मू आणि काश्मीर) यांना विशेष सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोहम्मंद जुनैद याला 7 जून तर आफताब याला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. कश्मीरमधून अटक केलेला आफताब हा जुनैद आणि लष्कर ए तोयबाचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय आहे .
एटीएसने मोहम्मंद जुनैद याला मे महिन्यात अटक केली होती. त्यानंतर पथकाने कारगील, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली. त्यानुसार श्रीनगरपासून 291 किलोमीटर अंतरावर असलेल्या किश्तवारमध्ये आफताबला ताब्यात घेतले. आफताबला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायाल्याने त्याला तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करून एटीएसच्या ताब्यात दिले. दोन्हीही संशयित लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेसाठी साथीदारांची भरती करणे, आर्थिक पुरवठा करणे, दारूगोळा व शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे उघडकीस आले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धार्मिक स्थळांसह संरक्षण दल आणि महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी त्यांनी केल्याचा संशय आहे. त्यानुसार तपास करावयाचा असल्याचे एटीएस सहायक पोलीस आयुक्त अरुण वायकर यांनी न्यायालयात सांगितले.

























































