तासभराच्या पावसाने दैना, महापुरात काय होणार; कोल्हापुरातील प्रशासनाच्या पावसाळीपूर्व कामावर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
परंतु ऐनवेळेला वरुण राजा प्रसन्न झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

जिल्ह्यात झालेल्या वळवाच्या तुफान वादळी पावसाने प्रशासनाच्या पावसाळी पूर्व कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे तासभर पडलेल्या पावसानेच एवढी दैना होत असेल तर महापुरात काय अवस्था होईल, याची भीती नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे. शहरातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा 20 ते 22 तासांहून अधिक काळ खंडित राहिला. दरम्यान, या पावसामुळे जीवितहानी झाली नसली, तरी कोटय़वधीची वित्तहानी झाल्याचे चित्र आहे.

वळवाच्या तुफान पावसाने काल सायंकाळी पाचच्या सुमारास कोल्हापूरकरांना झोडपून काढले. गारांच्या वर्षावात कोसळणाऱया पावसाने सर्वत्र दैना उडाली होती. शहरात ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले त्यामुळे वाहनांचेही नुकसान झाले. त्यात वायर तुटल्याने विद्युत खांब कोसळले होते. परिणामी रात्रभर तसेच आज दिवसभर शहरातील बहुतांश भागात सुमारे 20 ते 22 तास वीजपुरवठा खंडित राहिला. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही भटकावे लागले. वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली होती. त्यामुळे अधिकारी फोन उचलत नव्हते, तर तक्रारी घेणारे टोल फ्री नंबरला आलेले फोनही उचलले जात नव्हते.

शहरात ठिकठिकाणी अनेक वृक्ष उन्मळून पडले होते. मान्सूनपूर्व काम करताना महावितरण आणि महानगरपालिका यंत्रणेत याबाबतीत समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. त्यामुळे काही ठिकाणी विद्युत वाहिनीला अडथळा ठरणाऱया वृक्षांच्या फांद्या छाटण्यात आल्या, तर काही ठिकाणी ही मोहीम अर्धवटच राहिल्याने एका बाजूने झुकलेले वृक्ष पडल्याच्या घटनाही घडल्याचे यानिमित्ताने दिसून आले. शिवाय रस्ते बांधण्याच्या पद्धतीमुळे आज शहरात सर्वच ठिकाणी रस्ते उंच झाले असून, घरे आणि दुकानांची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी घरात आणि दुकानात शिरल्याचेही पाहावयास मिळाले.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले आणि गटरी साफसफाई करण्यात आल्या. मात्र, पहिल्याच जोरदार पावसाने महापालिकेच्या या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. शाहूपुरी परिसरातील नाल्यालगत असणाऱया अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. तर, पंचगंगा नदीला मिळणाऱया जयंती नाल्याची साफसफाई यानिमित्ताने प्रकाशझोतात आली. पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने येथे वाहतूकदारांची प्रचंड कोंडी झाली होती.