
नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल या भाजप नेत्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा जगभरातून तीव्र निषेध केला जाऊ लागला आहे. शर्मा आणि जिंदाल यांचे वादग्रस्त विधान हिंदुस्थानला भोवले आहे. त्यांच्या विधानांचा निषेध करतानाच कतार, कुवेतपाठोपाठ इराणने रविवारी हिंदुस्थानी दूतावासाला समन्स बजावले आणि वादग्रस्त विधानांवर कठोर शब्दांत आक्षेप नोंदवला.
भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली. त्यांच्या विधानांवर देशभरात तीव्र पडसाद उमटले. कानपूरमध्ये हिंसाचार उसळला. त्यानंतर आखाती देशांतून बेताल विधानांचा तीव्र निषेध केला जात आहे. कुवेत, कतार आणि इराण या देशांनी थेट हिंदुस्थानी दूतावासाला समन्स बजावून नूपुर शर्मा व नवीन कुमार जिंदाल यांच्या वादग्रस्त विधानांवर कडक शब्दांत विचारणा केली. त्यावर हिंदुस्थानी दूतावासाला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. शर्मा आणि जिंदाल यांची विधाने म्हणजे हिंदुस्थान सरकारचे विचार नाहीत. हिंदुस्थान विविधतेमध्ये एकतेच्या मजबूत सांस्कृतिक परंपरांनुसार सर्व धर्मांना सर्वोच्च सन्मान देतो. धार्मिक भावना दुखावणाऱयांविरुद्ध सरकार कठोर कारवाई करील, असे उत्तर हिंदुस्थानने आखाती देशांच्या समन्सवर दिले आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणाऱया व्यक्ती हिंदुस्थान सरकारमध्ये कुठल्याही अधिकृत पदावर नाहीत. त्यांना त्यांच्या पक्षाने निलंबित केले आहे. त्यांच्या विधानांशी सरकारचा कुठलाही संबंध नाही, असे तेहरानमधील हिंदुस्थानी दूतावासाने म्हटले आहे.
हिंदुस्थानी उत्पादनांवर आखाती देशांचा बहिष्कार
भाजप नेत्यांच्या बेताल विधानांचा हिंदुस्थानला मोठा फटका बसला आहे. आखाती देशांनी आपल्या दुकानांतील हिंदुस्थानी उत्पादनांवर बहिष्कार टाकला आहे. त्याचबरोबर हिंदुस्थानी चित्रपटांवरही बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मीडियातून केले जात आहे.
भाजपने नूपुर शर्मा यांना पक्षातून केले निलंबित
भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान त्यांनी पैगंबरांबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यांच्यावर गुन्हादेखील नोंदविण्यात आला होता.दरम्यान, या वादातून भाजपने काढता पाय घेतला असून पक्षश्रेष्ठीनी नूपुर शर्मा यांच्यावर कारवाई करताना त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले आहे. तसेच भाजपने मीडिया प्रभारी नवीनकुमार जिंदाल यांनादेखील निलंबित केले आहे. नूपुर शर्मा यांच्या विधानावरून सुरू झालेला वाद निवळण्यासाठी भाजपने आपण सर्व धर्मांचा आदर करतो, कोणत्याही धर्मातील पूजनीय व्यक्तींचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.



























































