‘शिव योग’ उपक्रमात तज्ञ योगा शिक्षक, प्रशिक्षण संस्थांना संधी; पालिकेकडून संपर्क साधण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांच्या तंदुरुस्तीसाठी पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱया ‘शिव योग’ उपक्रमात तज्ञ योगा शिक्षक, प्रशिक्षण संस्थांना पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना योगाचे धडे देण्याची संधी मिळणार आहे. सर्व 24 प्रशासकीय विभागांत सुरू होणाऱया शिव योग केंद्रांसाठी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी प्रकृती उत्तम राखणे सर्वोत्तम उपाय ठरतो. या पार्श्वभूमीवर पालिकेने सर्वसामान्यांसह वृद्ध, सहव्याधी असणारे आणि तरुणांमध्येही योगाची जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. ही योगा केंद्रे सार्वजनिक सभागृहे, पालिका किंवा खासगी शाळा, मंगल कार्यालये, पालिकेच्या जागा, सार्वजनिक ठिकाणी चालविण्यात येतील. शिवाय सोसायटीने जागा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणीही प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी इच्छुक संस्था-प्रशिक्षकांनी जवळच्या विभागीय कार्यालयाशी, विभाग कार्यालयात वैद्यकीय अधिकाऱयाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संस्था किंवा प्रशिक्षकाची निवड गुणवत्तेनुसार होणार आहे.

अशी होणार निवड

योग संस्था किमान दोन वर्षे योगा प्रमाणन मंडळ (योगा सर्टिफिकेशन बोर्ड/क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया) किंवा इंडियन योगा असोसिएशनमध्ये नोंदणीकृत असावी. तसेच संबंधित योग संस्था प्रशिक्षक पुरवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

योग प्रशिक्षण संस्थेची निवड करताना संस्थेचे प्रमुख तसेच योग प्रशिक्षक यांची मुलाखत घेतली जाईल. योग प्रशिक्षकांची नेमणूक करताना प्रशिक्षकांना योगाचे प्रात्यक्षिक करण्यास सांगितले जाईल. मुलाखत आणि प्रात्यक्षिक याचे 100 गुणांचे मूल्यांकन करण्यात येईल.

प्रशिक्षक हा नामांकित योग संस्थाकडून प्रमाणित आहे किंवा नाही तसेच शासन नियमांनुसार कॉमन योगा प्रोटोकॉलमध्ये किमान तीन वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र अथवा केंद्र सरकारचे ‘आरपीएल’ प्रमाणपत्र तपासून खात्री करण्यात येईल.