
जामखेड तालुक्यातील पाटोदा, भवरवाडी व खामगाव परीसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या वादळी पावसाने शेतातील झाडे उखडून पडले असुन शेतीचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसान झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून मदत करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
जामखेड शहरासह तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.बुधवारी (दि8) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पाटोदा, भवरवाडी व खामगाव या भागात मोठय़ा प्रमाणात वादळी पावसाने नागरिकांची व शेतकर्यांची तारांबळ उडाली. भवरवाडी याठिकाणी श्रीकांत पारवे, बाळु पारवे, कुंडल गायकवाड व देविदास काळे यांच्या घरांची पडझड होऊन यातील काही घरांचे पत्रे उडाल्याने संसार उघडय़ावर पडला आहे.
पाटोदा या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आण्णासाहेब गव्हाणे यांचे चिंचेचे झाड पडले तर दत्तात्रय कापसे यांच्या शेतातील लिंबोणीच्या बागेतील झाडे उखडून पडले आहेत. तर नाना गव्हाणे यांच्या घराचे देखील नुकसान झाले असल्याचे पाटोद्याचे माजी सरपंच गफार पठाण यांनी सांगितले. पाटोदा, भवरवाडी व खामगाव परीसरात अनेक ठिकाणी पावसाने बऱ्याच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. महसुल विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यात बहुतांश भागात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.
























































