बळीराजाने फेडलं ‘सर्जा-राजाच्या’च्या उपकारांचं देणं! सोलापूर जिल्ह्यात ‘कारहुणवी’ उत्साहात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आज पुजं रे बैलाले, फेड उपकाराचं देणं, बैला खरा तुझा सण, शेतकऱयावर तुझ रीन’ या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांचा सखा असलेला ‘सर्जा-राजा’चा ‘कारहुणवी’ सण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये बैलांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील सलगर येते कारहुणवीनिमित्त मोठा यात्रा भरते व रथोत्सव साजरा होतो.

सोलापूर जिह्याच्या सीमावर्ती तालुक्यांत आज कारहुणवी म्हणजेच बैलपोळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शेतकऱयांनी आपल्याकडील बैलजोडीची पूजा केली. सकाळी आंघोळ घालून बैलांना रंगविण्यात आले व सजविण्यात आले. मिरवणुकीने गावातील ग्रामदैवताच्या मंदिरासमोर नेऊन बैलजोडय़ांची पूजा करण्यात आली व त्यांना पुरणपोळ्यांचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला. सोलापुरात ‘कसबा गणपती शेतकरी संघटने’च्या वतीने सायंकाळी बाळीवेस येथून बैलजोडय़ांची मिरवणूक काढण्यात आली.

अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे ‘कारहुणवी’निमित्त भरणारी जत्रा प्रसिद्ध असून, कर्नाटक राज्यातील भाविकही यात्रा पाहण्यासाठी येतात. सकाळी ग्रामदैवत हनुमानाला अभिषेक करण्यात आला. दुपारी व सायंकाळी पालखी व रथोत्सव पार पडला. बैलांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली व बैलगाडय़ा पळविण्याचा कार्यक्रमही झाला. यावेळी शेतकरी व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यांतील अनेक गावांत कारहुणवीनिमित्त बैलजोडीची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली.