बनावट जात प्रमाणपत्र, समीर वानखेडेंना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एनसीबी मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे हे मुस्लिम असून मुंबई जात पडताळणी समितीला त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळले आहे. या प्रकरणी समितीने वानखेडे यांना जात प्रमाणपत्र रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटिसीला वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्या खंडपीठाने जिल्हा जात पडताळणी समितीला व राज्य सरकारला दोन आठवडय़ांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई जिल्हा जात पडताळणी समितीने समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राची तसेच प्रमाणपत्रासाठी त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर ते मुस्लिम असल्याचे आढळले. या प्रकरणी वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र जप्त किंवा रद्द का करण्यात येऊ नये, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस 29 एप्रिल रोजी पडताळणी समितीने त्यांना बजावली. ही नोटीस बेकायदा, चुकीची असून बाजू मांडण्याची आपल्याला परवानगी न देताच बजावण्यात आल्याचा दावा वानखेडे यांनी केला असून नोटीस रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. आपली आई मुस्लिम होती. लग्नानंतर ती हिंदू झाली. आपल्या जन्माच्या वेळी रुग्णालय प्रशासनाने वडिलांची परवानगी न घेताच जन्म दाखल्यावर मुस्लीम अशी नोंद केली, असा दावा त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या तक्रारीवरून जात पडताळणी समितीद्वारे प्रमाणपत्राची पडताळणी केली जात असून मलिक यांचा याच्याशी काहीही संबंध नाही, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

मलिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आपल्यावर आरोप केले असून त्यात तथ्य नसल्याचे वानखेडे यांचे म्हणणे आहे. जात पडताळणी समितीने बजावलेली नोटीस रद्द करण्यात यावी किंवा या प्रकरणाची चौकशी राज्य समितीकडून केंद्रीय समितीकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी खंडपीठाने जात पडताळणी समिती आणि राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 4 जुलैपर्यंत तहकूब केली.