
आषाढी पायी वारी माउलींचे पालखी सोहळ्याच्या आनंदवारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी भाविक आणि नागरिकांच्या स्वागतास आळंदी सज्ज झाली आहे. पालखी सोहळा प्रस्थान काळात भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी पुणे प्रशासनाच्या सूचनादेशा प्रमाणे तयारी करण्यात आली असल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
मंगळवारी ( दि.21 ) आळंदी मंदिरातून श्रींचे वैभवी पालखी सोहळयाचे प्रस्थान होत आहे. यासाठी आळंदीत राज्य परिसरातून लाखो वारकरी भाविक दिंड्या दिंड्यातून आळंदीत येत असतात. या भाविकांना विविध नागरी सेवासुविधा देण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण,तहसीलदार तथा आळंदी नगरपरिषद प्रशासक वैशाली वाघमारे, आळंदी मंडलाधिकारी स्वाती जोशी यांचे मार्गदर्शनात तयारी केली आहे. यात वेळोवेळी मिळालेल्या सूचना प्रमाणे नागरी सुविधा प्रभावी देण्याची तयारी विविध विभाग आणि खाते प्रमुख यांच्या समवेत सुसंवाद ठेवत कामकाज केले आहे. यामध्ये पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग,अतिक्रमण विभाग, स्वच्छता विभाग, आस्थापना विभाग, विद्युत विभागांचा समावेश आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण आणि वारकरी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
भाविकांसह नागरिकांना नियमित पुरेशा प्रमाणात आणि सुरळीत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. विभागातील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील सर्व मोटारींची दुरुस्ती देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. मोटारींची स्टँडबाय व्यवस्था चालू करून घेण्यात आली आहे. रहदारीस अरुंद परिसर असल्यामुळे ज्ञानेश्वर मंदिर व परिसरात दररोज सकाळी सहा वाजता एक तास पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टँकर फिलप पॉइंट ची दुरुस्ती करण्यात आली आहे. नवीन पूल ते गोपाळपुरा पूल दरम्यान साचलेली जलपर्णी काढण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी यात्रा 2022 यात्रा काळात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात देण्यात येणार आहे. भाविकांच्या दिंड्या वास्तव्याची ठिकाणे व मोकळ्या जागांची स्वच्छता करण्यात आली आहे. शहरात विविध 18 ठिकाणी सुमारे 1000 तात्पुरती शौचालये उभी करण्यात आली आहेत. OD spot आढळणार नाही यासाठी स्वच्छता गृहे परिसरात दक्षता घेण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. निर्मल वारीचे सुमारे 200 स्वयंसेवक यात्रा कालावधीत 18 ठिकाणी व नगरपरिषदेचे इतर सार्वजनिक शौचालये असणाऱ्या ठिकाणी भाविकांना मार्गदर्शक म्हणून रात्री 8 ते सकाळी 8 या कालावधीत तैनात रहाणार आहेत.
शहरात जंतुनाशक फवारणी व धुरीकरणास औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. सर्व मोकळ्या जागा, रहिवासी क्षेत्रात दैनंदिन जंतुनाशक व धूरफवारणीचे काम सुरू झाले आहे. यात्रा कालावधी करिता पिंपरी-चिंचवड महानगरपालिके कडून जंतुनाशक फवारणीस जादा मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध होत असल्याने यासाठी अडचण येणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
आषाढी यात्रा 2022 साठी आळंदी व दिघी पोलीस स्टेशन यांच्या मागणी नुसार शहरात गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हे काम पूर्ण झाल्या नंतर शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे यांचे थेट प्रक्षेपण होईल. आळंदी पोलीस स्टेशन येथील नियंत्रण कक्षातुन याबाबतचे निरीक्षण घेत भाविक वारकरी यांना तसेच यात्रा प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या जाणार आहेत.



























































