कब्रस्तानात सापडली बेडकाची 8 हजार हाडे, शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आश्चर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्खननाच्या वेळी पुरातत्त्व खात्याला अनेक प्राचीन अवशेष सापडतात, मात्र केंम्ब्रिज येथे बार हिल परिसरात रस्त्याच्या कडेला खोदकाम करत असताना वैज्ञानिकांना बेडकाची आणि प्राचीन टॉड जातीच्या प्राण्याची 8 हजार हाडे सापडली. या घटनेमुळे शास्त्रज्ञांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

शास्त्रज्ञांनी 2016 ते 2018दरम्यान लोहयुगात बांधलेल्या घराजवळ हे उत्खनन केले होते. यावेळी 14 मीटर लांब म्हणजे 6 फूट खोल खड्ड्यात ही हाडे त्यांना सापडली. बेडकांच्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्रज्ञांना एक मीटरपर्यंत माती खणावी लागली. एकाच ठिकाणी इतके अवशेष सापडणे ही विलक्षण आणि असामान्य बाब असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे शिवाय ही सर्व हाडे एका खड्ड्यात कशी आढळली, याचे कारण अद्याप शास्त्रज्ञांना समजू शकलेले नाही.

याबाबत लंडनच्या पुरातत्व संग्रहालयाचे वरिष्ठ विकी इवेन्स यांनी याबाबत सांगितले की, लंडनमध्ये इतक्या साइट्सवर काम करताना आम्हाला कुठेच बेडूक दिसले नाहीत, तरीही खोदलेल्या एकाच खड्ड्यात एवढी हाडे सापडल्यामुळे आश्चर्य वाटले. ही सर्व हाडे बेडूक आणि टोड जातीच्या प्राण्याची आहे. बेडकाची ही जात देशभरात आढळते. येथील एका डबक्यातही बेडकाचे अवशेष सापडले असल्यामुळे ही घटनाही शास्त्रज्ञांकरिता धक्कादायक आहे.

अश्मयुगात लोकं बेडूक खात असत, मात्र पुरातत्त्व विभागाला सापडलेल्या बेडकाच्या हाडांवर कापणे किंवा जळल्याची खूण नाही. त्यामुळे येथील लोकांनी बेडूक खाल्ले असतील याची खात्रीही शास्त्रज्ञांना वाटत नाही तसेच जेथे बेडकाची हाडे सापडली तेथे जळालेली पिके आणि त्यावर प्रक्रिया केल्याचे काही अवशेषही सापडले आहेत. पिकांमुळे इतर कीटक आणि बेडूक तेथे इतर किटकांना खाण्यासाठी आले असावेत किंवा वसंत ऋतुमध्ये प्रजननासाठी जागेचा शोध घेत असताना बेडूक या खड्ड्यात पडून अडकले असतील किंवा कडाक्याच्या थंडीमुळे बेडकांचा मृत्यू झाला असावा तसेच काही रोगांमुळेही असे घडले असावे असेही, मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

1980च्या दशकात ब्रिटनमध्ये रानाव्हायरसमुळे बेडकांची प्रजात नष्ट झाली होती. रानाव्हायरसचे विषाणू मासे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ला करतात. याकरिता बेडकांच्या संरक्षणासाठी फ्रॉग मॅटर्लिटी प्रोजेक्टही सुरू करण्यात आला होता.