JNU च्या प्राध्यापकाला ‘देशद्रोही’ म्हणत अपहरण करून मारहाण, अज्ञात गटाविरोधात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-baviskar-image

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) एका सहाय्यक प्राध्यापकाचे अज्ञात गटाने अपहरण करून घरात डांबून ठेवले आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पीडित प्राध्यापकाने पोलिसात तक्रार दाखल केली असून रस्त्यावर गाडी चालवताना झालेल्या वादाचे रुपांतर JNU वरील रागात झाल्याचे या प्राध्यापकाने म्हटले आहे.

JNU मधील प्राध्यापक शरद बाविस्कर शुक्रवारी रात्री कॅम्पसच्या दिशेने जात असताना गाडी चालवण्यावरून त्यांचा एका गटासोबत वाद झाला. आरोपींनी बाविस्कर यांना गाडीतून ओढून त्यांचे अपहरण केले. त्यांना दिल्लीतील एका घरात तीन तास डांबून ठेवले. JUN चे प्राध्यपक असल्याने ‘देशद्रोही’ म्हणत सतत शिवराळ भाषा वापरत मारहाणही केली. त्यानंतर बरीच विनवणी केल्यानंतर ही त्यांची सुटका करण्यात आली. मात्र त्याचवेळी गाडी, पाकीट आणि क्रेडिट कार्डही चोरल्याचा आरोपही त्यांनी केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापकाने शनिवारी तक्रार दाखल केली आणि नंतर हे प्रकरण नरैना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले.

डीसीपी (पश्चिम) घनश्याम बन्सल म्हणाले, ‘आम्ही प्राध्यापकाची तक्रार घेतली. आयपीसी कलम 323 (दुखापत करणे), 365 (अपहरण), 392 (दरोडा) आणि 334 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधण्यासाठी आम्ही पथके तैनात केली आहेत.’

sharad-baviskar

एका फेसबुक पोस्टमध्ये, प्राध्यापकाने आरोप केला आहे की, आरोपीला ‘जेएनयू आवडत नाही’ आणि आरोपींनी प्राध्यापकाला ‘देशद्रोही’ म्हणून संबोधले आणि हल्लाही केला. तसेच ओरापी गट हा मोदी समर्थक असल्याचेही त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांची कार, पाकीट, क्रेडिट कार्ड चोरीला गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

मात्र, हा प्रकार JNUच्या वादावरून झाला की नाही याची पुष्टी पोलिसांनी केलेली नाही. ‘रोड रेजची प्रकरणे वाढली आहेत; आरोपींनी प्राध्यापकाचे अपहरण करून त्यांचे सामान लुटले. इतर आरोपांची पडताळणी केली जात आहे,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

जेएनयू टीचर्स असोसिएशन (जेएनयूटीए) ने देखील या घटनेवर एक निवेदन जारी केले; ‘रस्ते वाहतूक वादातून कथितपणे उद्भवलेल्या एका घटनेत, प्राध्यापक बाविस्कर यांनी हा वाद पोलीस ठाण्यात नेण्याचे बोलताच त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना दिल्लीतील एका घरात नेण्यात आले जेथे त्यांना तीन तासांपेक्षा जास्त काळ कैद ठेवण्यात आले. त्यांनी अपहरणकर्त्यांना सुटकेसाठी विनवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करण्यात आल्या, मारहाण केली, धमकावण्यात आले आणि चोरीही करण्यात आली. प्राध्यापक बाविस्कर यांनी 18 जून रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

जेएनयूटीएने म्हटले आहे की त्यांना आशा आहे की दिल्ली पोलीस दोषींना पकडतील आणि प्राध्यापक आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी देतील.