नरेंद्र मोदी यांचा मृत्यू हिटलरप्रमाणेच होईल, काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेवरून देशभरात संतापाचा आगडोंब उसळला आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एका काँग्रेस नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे.

केंद्र सरकारची अग्निपथ योजना आणि राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करताना काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहे. मोदी सरकारला विरोध म्हणून काँग्रेसचे नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे धरणे आंदोलन सुरू आहे. या दरम्यान काँग्रेस नेता सुबोध कांत सहाय यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत सहाय यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले की, मला वाटतं की हिटलरचा सगळा इतिहास मोदी यांना माहीत आहे. हिटलरने देखील एका अशाच संस्थेची निर्मिती केली होती. त्याचं नाव होतं खाकी. ही संस्था त्याने सैन्यातच बनवली होती. नरेंद्र मोदी हे सुद्धा हिटलरच्या मार्गाने जात आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू देखील हिटलरप्रमाणेच होईल, असं वादग्रस्त विधान सहाय यांनी केलं आहे. या विधानामुळे नवीन वाद उद्भवला आहे.

‘अग्निपथ योजने’वरून उडालेला भडका वाढला असून बिहार, उत्तर प्रदेशपासून गुजरात, जम्मूपर्यंत हिंसक आंदोलन पसरले आहे. आगडोंब, तोडफोड कायम आहे. सर्वाधिक नुकसान रेल्वेचे झाले आहे. आतापर्यंत चार दिवसांत 12 रेल्वे पेटविल्या, अनेक स्टेशन्स फोडले, शेकडो वाहने जळून खाक झाली. संतप्त तरुणांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला, गोळीबार केला. धरपकड सुरू केली आहे.