
उत्तम गुणांनी परिपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणजे विनय आपटे. विनय आपल्या कामाशी अतिशय प्रामाणिक होता आणि स्वभावाने बेडर होता. त्याचे बरेचसे गुण आमच्यामध्ये आले आहेत. तो अभ्यासू नट तर होताच, परंतु तो एक उत्तम माणूस होता, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी अभिनेते-दिग्दर्शक विनय आपटे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
विनय आपटे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने विनय आपटे यांच्या स्मृतिदिनी मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघामध्ये पारितोषिक प्राप्त ‘स्टार’ आणि ‘जीर्णोद्धार’ या दोन एकांकिकांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात अरुण नलावडे यांनी विनय आपटे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्या भावना उलगडल्या. पुढे ते म्हणाले, उकाडय़ामध्ये पावसाचा शिडकावा व्हावा तशी माझी आणि विनयची ओळख झाली. त्या वयात असताना आम्ही तर चाचपडत होतो. हौशी रंगभूमीवर काम करीत होतो. नाटय़दर्पणच्या एका एकांकिकेसाठी परीक्षक असताना त्या एकांकिकेत माझी चार मिनिटांची भूमिका होती आणि त्याकरिता मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. एखाद्याचे गुण हेरायचे कसे, याची उत्तम शिकवण मला विनयकडून मिळाल्याचे नलावडे यांनी नमूद केले.
यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वैजयंती आपटे-कुलकर्णी, अभिनेते संजय मोने, भरत दाभोलकर, अभिनेत्री श्वेता पेंडसे, महाराष्ट्र सेवा संघाचे कार्यवाह जयप्रकाश बर्वे, कला विभागप्रमुख महेंद्र तेरेदेसाई तसेच नाटय़क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



























































