
महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबलेल्या मालवाहतूक ट्रकची डिझेल चोरी करून दरोडा टाकणारी मध्य प्रदेशातील टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली आहे. राजाराम गंगाराम फुलेरिया (वय 38), धर्मेंद्र शिवनारायण उर्फ शिवलाल सोलंकी (वय 27), राहुल जुगलकिशोर चंदेल (वय 21, रा. रामदुपाडा, मध्य प्रदेश), अशोक रामचंदर मालवीय (वय 21), गोविंद पिरूलाल मालवीय (वय 30, दोन्ही रा. सांगवीमाना, मध्य प्रदेश), अनिकेत राजेश बोरनार (वय 24, रा. नेवासा) अशी आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाला वडगाव गुप्ता येथे काहीजण ट्रकजवळ स्कार्पिओ गाडी उभी करून संशयितरीत्या हालचाली करताना दिसून आले होते. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी राहुरीच्या दिशेने पलायन केले. सदर इसम ट्रकमधील डिझेल चोरी करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी राहुरी व सोनई पोलिसांशी संपर्क करून पाठलाग केला तसेच नाकाबंदी केली. त्यावेळी आरोपी उसाच्या शेतातून पळून गेले होते. दरम्यान, मारहाण करून धारदार शस्त्र्ा गळ्याला लावून जीवे मारण्याची धमकी देऊन ट्रकमधून डिझेल चोरल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुह्याचा तपास करीत असताना आरोपी हे चांदा (ता. नेवासा) येथील एका वस्तीवर भाडेतत्त्वावर राहत आहे. ते मध्य प्रदेशमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, उपनिरीक्षक सोपान गोरे, हेडकॉन्स्टेबल संदीप घोडके, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप दरंदले, रवि सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.




























































