शिवसेना अंगार है… बाकी सब भंगार है! संतप्त शिवसैनिकांचा कोल्हापुरात प्रचंड मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शिवसेना अंगार है… बाकी सब भंगार है…’, ‘उद्धवसाहेब आगे बढो… हम तुम्हारे साथ है…’ अशा जोरदार घोषणा देत कोल्हापुरातील कडवट शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले. ‘यापुढेही कितीही संकटे आली, तरी आम्ही शिवसेना आणि पक्षपमुख उद्धव ठाकरे यांची साथ कधीच सोडणार नाही,’ अशी वज्रमूठ करून शिवसैनिकांनी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून सामूहिक शपथ घेतली. शिवसेनेशी गद्दारी करणारे एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचाही शिवसैनिकांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ‘अरे एवढे सैनिक कशाला… गद्दाराला गाडायला…’, ‘मासा लागला गळाला… एकनाथ शिंदे पळाला…’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.

गद्दारी करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरील आमदारांविरोधात आता सामान्य शिवसैनिक पेटून उठू लागला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोल्हापुरातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ऐतिहासिक दसरा चौक येथून भगवे झेंडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ फलक घेऊन ‘शिवसेना झिंदाबाद…’, ‘उद्धवसाहेब आगे बढो… हम तुम्हारे साथ है…’ अशा घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गांवरून ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांचे जथे मोर्चाने धडकले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुरेश साळोखे, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, हर्षल सुर्वे, शुभांगी पवार, शुभांगी साळोखे, राजू यादव, राजू सांगावकर, सुजित चव्हाण, शशिकांत बीडकर आदी पदाधिकाऱयांसह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

गद्दारांना संपविल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही – अरुण दुधवडकर

‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना आहे. पक्षप्रमुख या नात्यासह शिवसैनिकांमध्ये आणि या राज्यातील तमाम जनतेत एक कुटुंबातील सदस्य म्हणून स्थान मिळविणारे उद्धव ठाकरे हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. मात्र, दुर्दैवाने पक्षातीलच विघ्नसंतोषी आज गद्दार झाले आहेत. आजपर्यंत अनेकांनी शिवसेना संपविण्याची भाषा केली, प्रयत्न केले. मात्र, शेवटी तेच संपले. नारोबापासून याची अनेक उदाहरणे आहेत. आता याचप्रमाणे एकोबाही संपल्याशिवाय राहणार नाही. तसेच अशा गद्दाराला साथ देणाऱ्या गद्दार आमदारांनाही स्वाभिमानी जनता आणि कडवट शिवसैनिक संपविल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला.

56 गेले तरी 156 निवडून आणू!

‘ज्या शिवसैनिक आणि जनतेने यांना निवडून दिले, त्यांचा अवमान करणाऱया गद्दारांना कोल्हापूरकरांनी झिडकारले आहे. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत येथील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहून त्यांना साथ देतील, त्यांचा आदेश मानतील. आज 56 गेले तरी 156 निवडून आणू,’ असे वचनही जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, संजय पवार, विजय देवणे यांनी दिले. तसेच जिह्यात यापूर्वी तत्कालीन आमदाराने शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर केलेल्या ‘शेण फेको’ आंदोलनाचीही यावेळी आठवण काढण्यात आली.

शिवसैनिकांच्या भीतीने शिंदेसमर्थनाचा फलक गुंडाळला

शिवसेनेशी गद्दारी केलेले एकनाथ शिंदे यांच्या अज्ञात समर्थकाकडून मध्यरात्री शहराच्या रंकाळा बस स्थानकासह राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या घराशेजारील माळकर तिकटी, तसेच कावळा नाका परिसरात फलक झळकाविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, येथील शिवसैनिकांच्या आक्रमकपणाला घाबरून अवघ्या काही मिनिटांतच फलक लावणाऱयांकडूनच ते गुंडाळण्यात आले.