दहा वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात गुन्हेगाराला अटक, सातारा गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिह्यातून गेली 10 वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देणारा कुख्यात गुन्हेगार संजय ऊर्फ संज्या नमण्या पवार (रा. सासपड झणझणे, ता. फलटण) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले. संशयितावर खून, दरोडा, पोलिसांवर हल्ला करणे यांसारखे 17 गुन्हे दाखल आहेत.

संशयित संज्या पवार याच्यावर लोणंद, फलटण, खंडाळा या पोलीस ठाण्यांमध्ये 17 गुन्हे दाखल आहेत. संशयिताने काही घटनांमध्ये किती दहशत केली आहे, याची माहिती समोर आली आहे. त्यातील पहिली घटना 3 जुलै 2017 रोजीची आहे. संशयिताला पकडण्यासाठी माळीबेनवस्ती वडाचा मळा या ठिकाणी फलटण ग्रामीणचे फौजदार राहुलकुमार भोंळ यांचे पथक गेले होते. या घटनेत संशयित संज्या पवार व त्याच्या नातेवाईकांनी तलवार, कोयते व लाकडी दांडक्याने पोलिसांवरच हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी स्वतःचा बचाव केला. मात्र, संशयितांनी पोलिसांच्या खासगी वाहनाची तोडफोड करून नुकसान केले.

दुसरी घटना 30 डिसेंबर 2018 रोजीची आहे. संशयिताला पकडण्यासाठी लोणंद व फलटणचे पोलीस (भिलकटी, ता. फलटण) येथे गेले होते. पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयिताने स्वतःकडे हत्यार ठेवून तेथून उसाच्या शेतात पळ काढला. पोलीस पथकाने पाठलाग केला असता, संशयिताने एका पोलिसाला दगड मारून जखमी केले. यावेळी संशयिताने पोलिसांना लांबूनच चाकू दाखवीत ‘माझ्याजवळ आला तर मारून टाकीन,’ अशी धमकी दिली होती.

पोलिसांनी वेळोवेळी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडत नव्हता. दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला संशयित पवारची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी भुरकरवाडी येथे सापळा लावला. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पुन्हा पोलिसांवर हल्ला केला. मात्र, पोलिसांनी बचाव करीत त्याच्या हत्यारांसह मुसक्या आवळल्या.

जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार अमित पाटील, पोलीस उत्तम दबडे, तानाजी माने, संतोष पवार, संतोष सपकाळ, कांतीलाल नवघणे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडिक, नीलेश काटकर, अजित कर्णे, गणेश कापरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.