गोव्यात जिम ट्रेनरने केली 35 वर्षीय प्राध्यापिकेची गळा आवळून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात कोरलीम येथील 35 वर्षीय प्राध्यापिका गौरी आचारी यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी जुने-गोवा पोलिसांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील सावंतवाडी येथील 36 वर्षीय गौरव बिद्रे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गौरी यांच्या आईने आरोपी बिद्रे याच्या विरोधात आपल्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान जिम इंस्ट्रक्टर असलेल्या गौरव बिद्रे याला अटक करण्यात आली आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने कबुली दिली की त्यानेच गौरीचा कोरलीम येथे गळा आवळून खून केला. यानंतर त्याने कोरलीम येथील प्रिमोस पार्कजवळ कार उभी केली आणि मृतदेह एका एसयूव्हीमध्ये हलवला. यानंतर त्याने जुना-गोवा येथील कदंबा बायपास रोड जवळच्या जंगलात मृतदेह फेकून दिला.

आरोपी बिद्रे हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा आणि भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक राहिला आहे. तसेच तो एक मॉडेल देखील होता. त्याने गेल्या महिन्यात गोवा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाशी (एटीएस) संलग्न कमांडोना फिटनेसचे प्रशिक्षणही दिले होते. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टम तपासणीसाठी गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, बांबोलीम येथे पाठवला.

प्राध्यापिका गौरी आचारी या खांडोळा येथील शासकीय महाविद्यालयात अध्यापन करीत होत्या. पोलिसांच्या पथकाने प्रथम बिद्रेला त्याच्या फ्लॅटवर विचारपूस केली आणि त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली असता त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी तणावाच्या कारणावरून आरोपीने तिची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

तीन वर्षांपूर्वी मुंबईतील बोरिवली येथील व्यायामशाळेत एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बिद्रेला अटक करण्यात आली होती आणि तो जामिनावर सुटला होता. आता बिद्रे विरुद्ध भादंवि कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.