
सोशल मीडियात प्रक्षोभक फोटो आणि मजकूर पोस्ट केल्याच्या आरोपावरून ‘ऑल्ट न्यूज’चे सह-संस्थापक, पत्रकार मोहम्मद झुबेर यांना सोमवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष युनिटने अटक केली. झुबेर यांना दुसऱया प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान दुसऱया प्रकरणात झुबेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. या कारवाईवरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना झुबेर यांच्या अटकेच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. तसेच न्यायालयाने त्यांच्याविरोधातील सर्व गुन्हे एकत्र केले असून त्याच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहेत. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेले सर्व सहा एफआयआर दिल्लीच्या विशेष पोलिसांकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या विशेष पथकाला देखील काम थांबविण्याल सांगितले आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोहम्मद झुबेर यांना 2020मधील दुसऱया प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. ही चौकशी सुरू असताना संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी 2018 मध्ये केलेल्या ट्विटबद्दल झुबेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या ट्विटमधून झुबेर यांनी विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. भादंवि कलम 153/295 अंतर्गत आरोपीला नोटीस देणे बंधनकारक आहे. असे असताना या तरतुदीचे पालन न करता दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचा आरोप झुबेर यांच्या वतीने करण्यात आला आहे.




























































